आजचे हवामान: राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. अनेक शहरांमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे. आजचे तापमान आणि हवामानाचा अंदाज जाणून घ्या
आजचे हवामान (Aajche Havaman):
मार्च महिन्याची सुरुवात होताच राज्यभर उकाड्याची तीव्रता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. काही भागांमध्ये तापमानाने 40°C चा टप्पाही ओलांडला असून अनेक शहरांमध्ये पारा 39°C पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत आणि दैनंदिन कामांवरही त्याचा परिणाम होत आहे.
कडक उन्हामुळे शक्यतो अत्यावश्यक काम असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात येत आहे.
सोलापूरमध्ये या आठवड्यात तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. तर काल पुण्यातही पारा 39 अंश सेल्सिअसपर्यंत गेला. मागील काही दिवसांपासून पुण्यात उन्हाची तीव्रता वाढलेली जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पुण्यात तापमान जवळपास स्थिर राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, जळगाव, भुसावळ, अकोला, नागपूर, सोलापूर आणि अमरावती या शहरांमध्येही तापमानात वाढ झाली आहे. पुणे आणि नाशिकमध्ये फेब्रुवारीपर्यंत थंड वातावरण होते; मात्र मार्च सुरू होताच उष्णतेची तीव्रता वाढल्याचे दिसत आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडल्यावर कडक उन्हामुळे शरीराला प्रचंड उकाडा जाणवतो. होळीपूर्वीच नागरिकांना या तीव्र उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
साताऱ्यात काल कमाल तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तर कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईतही दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेषतः पुरेसे पाणी पिणे, तसेच बाहेर जाताना स्कार्फ किंवा डोक्यावर संरक्षण ठेवणे गरजेचे आहे.
आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण राहण्याची शक्यता असून हवामानात मोठा बदल अपेक्षित नाही. मागील आठवड्यात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. दरम्यान, सांगलीमध्येही तापमान वाढताना दिसत असून काल ते सुमारे 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.