अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची सत्ता कोणाच्या हाती?
बारामतीत राजकीय रंगत शिगेला!
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत 🗳️
बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच राजकीय समीकरणं बदलली 😮
आता बारामतीत होणार थेट सामना?;महायुती vs काँग्रेस ; कोण मारणार बाजी?;स्थानिक राजकारणात वाढणार तापमान
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले बारामतीकडे .
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दुपारी १२.३० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्याने बारामतीतील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार झाली असून या पोटनिवडणुकीत थेट सामना होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. महायुतीकडून बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या निमित्ताने प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे यावेळी उपस्थित राहून शक्तिप्रदर्शनाला बळ देणार आहेत. यासोबतच छगन भुजबळ यांच्यावर या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून बारामतीत त्यांच्या जाहीर सभाही आयोजित करण्यात येणार आहेत, त्यामुळे या पोटनिवडणुकीत राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सुरुवातीला काहीसा पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असून शिवसेना ठाकरे गटानेही सामंजस्याची भूमिका घेत निवडणुकीपासून दूर राहण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र काँग्रेसने स्वतंत्र भूमिका घेत अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आकाश मोरे हे माजी आमदार विजय मोरे यांचे पुत्र असून निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिल्याने राजकीय समीकरणांमध्ये आणखी गुंतागुंत वाढली आहे. त्यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी भेट घेतली असली तरी त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप स्पष्टता समोर आलेली नाही, त्यामुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच चुरशीचे झाले आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार नितेश राणे आणि रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राकाकी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचा उल्लेख करत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच इतर उमेदवार आणि त्यांच्या पक्षांनीही यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र, तसे झाले नाही तर अजित पवार आजही ही निवडणूक लढवत आहेत, असे समजून बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्येक मत हे अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, विरोधकांनी हा प्रस्ताव नाकारत लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले असून बारामतीतील ही निवडणूक आता चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.