भारत बंद 12 फेब्रुवारी 2026: कामगार संघटनांचा देशव्यापी संप – काय आहे पार्श्वभूमी?
मुंबई :
केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी धोरणांविरोधात आज, १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर दुपारी ३ वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्रातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून, कामगार-कर्मचारी संघटनांची संयुक्त कृती समिती पुढाकार घेत आहे. इंटक, आयटक, एचएमएस, सीटू, एनटीयूआय, भारतीय कामगार सेना, एआयसीसीटीयू, एआयबीईए, बीईएफआय, एआयआयईए, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, श्रमिक एकता मंच, कामगार एकता, स्वतंत्र फेडरेशन यांसह २० हून अधिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारची भूमिका कठोर आणि असंवेदनशील असल्याची टीका करण्यात आली आहे. सरकार परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याने, आता संसदेत खासदारांच्या माध्यमातून त्यांना जाब विचारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मुंबईसह देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एनटीसीच्या २३ पेक्षा जास्त गिरण्या मागील पाच वर्षांपासून बंद असल्याने हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय, आधीचे २९ प्रभावी कामगार कायदे रद्द करून केंद्राने चार नवीन कामगार संहितांची अंमलबजावणी केली आहे. या बदलांमुळे कामगार वर्ग अधिक अडचणीत सापडल्याचेही सांगण्यात आले.
शंभर वर्षांच्या संघर्षातून कामगार संघटनांनी मिळवलेले कामगार हिताचे २९ कायदे केंद्र सरकारने रद्द करून त्याऐवजी चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत. या निर्णयामुळे कामगार वर्गाचे भविष्य धोक्यात आले असून ते अधिक असुरक्षित झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केला.
हे कामगार सहभागी होणार :
संयुक्त कृती समितीच्या माहितीनुसार, बँक कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, फेरीवाले, घरगुती कामगार, कंत्राटी कर्मचारी, तसेच बस, रिक्षा, टॅक्सी चालक आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने पार पाडले जाईल, असेही समितीने स्पष्ट केले आहे.
काय बंद?
सार्वजनिक वाहतूक, बॅंकिंग, विमा सेवा, सरकारी कार्यालय, बाजारपेठा, दुकानं, शाळा-महाविद्यालयं
काय सुरु?
रुग्णालय, औषधांची दुकानं, रुग्णवाहिका आरोग्यसेवा, दूध भाजीपाला पुरवठा, अग्निशमन आपत्कालीन सेवा, वीज पाणीपुरवठा
महाराष्ट्र काँग्रेसने पाठिंबा दर्शविला :
भारत बंदला महाराष्ट्र काँग्रेसने अधिकृत पाठिंबा दिला आहे. कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे कामगारांच्या हिताला धक्का बसला असून त्यांच्या रोजगाराच्या संधीही कमी होण्याची शक्यता असल्याचा पक्षाचा आरोप आहे. या धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
शेतकरी संघटनाही या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारची धोरणे कामगार आणि शेतकरीविरोधी असल्याचे सांगत, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले.