Gold-Silver Price 18 Feb 2026: घसरणीला ब्रेक! चांदीत जोरदार वाढ, सोन्याच्याही दरात तेजी; मोठ्या पडीनंतर सराफा बाजारात पुन्हा तेजीची चिन्हे?
Gold and Silver Prices in India February 18:
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला बुधवारी अखेर विराम मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत झालेल्या घटेचा परिणामही या दरांवर दिसून आला. त्यामुळे भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा वाढीचा कल दिसू लागला आहे.
Gold-Silver Prices:
सोने-चांदीचा आजचा दर काय
एमसीएक्सवरील एप्रिल महिन्याच्या सोन्याच्या फ्युचर्समध्ये सुमारे 2,000 रुपयांची म्हणजेच 1.2 टक्क्यांची वाढ होऊन दर 1,53,303 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. त्याचप्रमाणे मार्च महिन्याच्या चांदीच्या फ्युचर्समध्येही 4,100 रुपयांची म्हणजे जवळपास 2 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आणि दर 2,32,930 रुपये प्रति किलोवर गेला.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली, कारण विक्रीचा दबाव कमी झाला होता. मात्र अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने तसेच अमेरिका-इराण चर्चेत सकारात्मक प्रगती झाल्याने ही वाढ काही प्रमाणात मर्यादित राहिली. याशिवाय चीन, कोरिया आणि इतर अनेक आशियाई बाजारपेठांमध्ये लुनार नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे व्यवहार कमी झाल्यानेही तेजीला काहीसा आळा बसला.
फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर मायकेल बार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित चलनवाढ 2 टक्क्यांच्या लक्ष्यापर्यंत खाली येईपर्यंत व्याजदरांमध्ये काही काळ बदल न करता ते स्थिर ठेवले जाऊ शकतात.
सोने-चांदीच्या किमतीतील वाढीचा वेग कमी झाला.
विश्लेषकांच्या मते, सोने-चांदीतील गुंतवणूकदार सध्या अमेरिकेतील महत्त्वाच्या आकडेवारीची प्रतीक्षा करत आहेत. यामध्ये फेड रिझर्व्हची मिनिट्स, औद्योगिक उत्पादनाचे आकडे आणि पीसीई किंमत निर्देशांकाचा समावेश असून, या घडामोडींमुळे भविष्यातील धोरणात्मक निर्णय आणि बुलियन बाजारातील ट्रेंड ठरणार आहेत.
दरम्यान, भू-राजकीय पातळीवर मंगळवारी जिनिव्हा येथे झालेल्या अणु चर्चेच्या दुसऱ्या फेरीत इराण आणि अमेरिका यांच्यात काही प्रमुख ‘मार्गदर्शक तत्त्वांवर’ सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप सर्व मुद्द्यांवर अंतिम निर्णय झालेला नाही, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्या हवाला देत रॉयटर्सने वृत्त दिले आहे.
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी मंगळवारी अमेरिकेने इराणविरोधात शक्ती वापरण्याच्या धमक्या त्वरित मागे घ्याव्यात, असे वक्तव्य केल्याचे रॉयटर्सने पुढे नमूद केले आहे.
भू-राजकीय तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्याने सोन्याच्या किमतीतील तेजी काहीशी मर्यादित राहिली. मात्र मागणी-पुरवठ्यातील असमतोलामुळे चांदीच्या दरात वाढ कायम आहे. गेल्या वर्षभरात चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांनी चांगला परतावा मिळवला असून सध्या अनेक गुंतवणूकदार नफावसुलीकडे वळताना दिसत आहेत.