LPG Gas Cylinder: पुणे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
पुणे : युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होईल, अशा चर्चांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिक गॅस संपण्याच्या भीतीने अतिरिक्त सिलिंडर साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी लोक गॅस एजन्सी किंवा दुकानदारांकडे चौकशीसाठी गर्दी करत असल्याचेही दिसत आहे. या परिस्थितीमुळे नेहमीपेक्षा गॅस सिलिंडरच्या बुकिंगमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक घाबरून गॅस साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांना नियमितपणे सिलिंडरचा पुरवठा होत आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभाग सर्व गॅस एजन्सींवर सतत लक्ष ठेवून आहेत. यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
कोणत्याही वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने सिलिंडर विक्री करणे किंवा इतर कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवांना आणि विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.