मोठी राजकीय घडामोड: सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह आणखी एक जबाबदारी; पार्थ-जय पवार मुंबईकडे रवाना
Sunetra Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत होणाऱ्या शपथविधीनंतर त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाल्याची चर्चा आहे. या पदावर कुणाची नियुक्ती होणार, याबाबत गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अशातच आता सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्या मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार असून, त्याआधी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सायंकाळी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्रीपदासोबतच सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्रीपदासोबतच अजित पवारांकडे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार असल्याचे समजते.
त्यामुळे सुनेत्रा पवार आता अजित पवारांप्रमाणेच दुहेरी महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उद्या मुंबईत आमदारांची बैठक
सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाकडून विधीमंडळ सचिवालयाला पत्र पाठवण्यात आले आहे. उद्या आमदारांच्या बैठकीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. ही बैठक विधानभवनात होणार आहे.
दरम्यान, या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत.
कुठलाही निर्णय घ्यायचा असेल त्याला आमचा पाठींबा – देवेंद्र फडणवीस
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
फडणवीस म्हणाले, “अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. ते जो काही निर्णय घेतील, त्याला आमचे पूर्ण समर्थन असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयाला भाजप आणि राज्य सरकारचा संपूर्ण पाठींबा राहील.”
ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादीचे नेते माझ्याशी दोन वेळा चर्चा करून गेले आहेत. या चर्चांमध्ये त्यांची कार्यपद्धती, उपलब्ध पर्याय यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय हा संबंधित पक्षाचाच असेल. त्या निर्णयावर मी आत्ताच काही बोलणे योग्य ठरणार नाही.”