रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात नवा धक्का; अकोला कनेक्शन उघडकीस
Rohit Shetty Firing Case: गोळीबार प्रकरणाच्या तपासात अकोला कनेक्शन, बिश्नोई टोळीचा सहभाग संशयात :
Rohit Shetty Firing Case Update:दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर रविवारी गोळीबाराचा प्रकार घडल्याने मुंबईसह संपूर्ण सिनेविश्वात खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले असून आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अवघ्या 24 तासांत तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून या प्रकरणाचा थेट कनेक्शन अकोल्याशी असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमधून रोहित शेट्टी यांना धमकी देण्यात आली असून, हा गोळीबार फक्त ‘ट्रेलर’ असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
रोहित शेट्टी प्रकरणाचं अकोल्याशी कनेक्शन काय?
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात शुभम लोणकर याचं नाव तपासात समोर आलं आहे. शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील असून अकोट तालुक्यातील नेव्होरी गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे. त्याच्यावर याआधीही पोलिसांनी कारवाई केली असून, बंदूक तस्करी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार असल्याची नोंद आहे. अकोला पोलिसांनी त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केली होती.
दरम्यान, शुभम लोणकरचा लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांच्याशी संपर्क असल्याची माहितीही पोलीस तपासातून उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम लोणकर आणि बिश्नोई गँगमध्ये नेमका कोणत्या स्वरूपाचा संवाद झाला आहे, याचा शोध घेण्यासाठी त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग तपास यंत्रणेकडे पाठवण्यात आले आहेत.
रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामागे नेमका कुणाचा हात आहे, हे तपासातून लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अकोला कनेक्शन समोर आल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची चिन्हं आहेत.
रविवारी नेमकं काय घडलं?
१ फेब्रुवारी, रविवारी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली. या घटनेनंतर रोहित शेट्टी यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी घरातील कुटुंबीय आणि मित्रांना काही काळ घराबाहेर न येण्याची विनंती केली होती.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली असून सध्या त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, शुभम लोणकर या आरोपीचा सखोल तपास सुरू असून या प्रकरणातील त्याची भूमिका काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.