2 दिवसांत पेट्रोल-डिझेलची विक्री 15 टक्क्यांहून अधिक वाढली, HPCL कडून आवाहन
आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्र्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आवाहन केले आहे. घाबरून इंधन साठवण्याऐवजी जबाबदारीने वागावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा देखील करण्यात आली आहे.
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसतानाही, पश्चिम आशियातील तणावामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. या भीतीमुळे लोक विनाकारण मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करत असल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी, गेल्या दोन दिवसांत देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर काही भागांमध्ये ही वाढ सरासरी दैनंदिन विक्रीच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे. कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की, देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणत्याही प्रकारच्या तुटवड्याची परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून किंवा अफवांवर विश्वास ठेवून इंधन साठवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच अनावश्यक खरेदी टाळावी.
यासंदर्भात HPCL ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून अधिकृत स्पष्टीकरण देत सांगितले की, अलीकडच्या काही दिवसांत इंधनाच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ प्रामुख्याने भीती आणि गैरसमजुतीमुळे होत असून प्रत्यक्षात पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे. कंपनीने जनतेला संयम राखण्याचे आणि जबाबदारीने वागण्याचे आवाहन करत, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा पुनरुच्चार केला आहे.