सीएनजी वापरणाऱ्यांना मोठा धक्का; तिसऱ्यांदा दरवाढ, किंमत पोहोचली नव्या उच्चांकावर
महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ, वाहनचालकांच्या खिशावर वाढला भार
इराण-अमेरिका संघर्ष संपुष्टात आल्यानंतर इंधनाच्या किमतीत दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीही घसरू लागल्या आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला असून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
युद्धकाळात होर्मुज सामुद्रधुनीवरील तणावामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा प्रभावित झाला होता, परिणामी जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्या. त्याचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवरही झाला. या काळात पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.
आता परिस्थिती सामान्य होत असताना दर कमी होण्याची अपेक्षा असतानाच सीएनजीच्या किमतीत सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार ग्राहकांना प्रति किलो सीएनजीसाठी 95.75 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 8 मे रोजीही सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
या नव्या दरवाढीमुळे वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होणार असून महागाईचा ताण कायम राहण्याची शक्यता आहे.