एकनाथ शिंदेंचे संकेत स्पष्ट, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; राज्यातील मोठ्या घडामोडींना आज वेग
एकनाथ शिंदेंच्या सूचक वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट अधिक सक्रिय झाला असून, आज आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदारांच्या फुटीनंतर आमदारांमध्ये एकजूट कायम ठेवण्यावर भर दिला जाणार असून, आगामी पावसाळी अधिवेशनासाठीची रणनीतीही या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्या महाविकास आघाडीची ‘डिनर डिप्लोमसी’ होणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे.
ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’ थांबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “आणखी दोन दिवस थांबा, मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल,” असे सूचक वक्तव्य करत नव्या चर्चांना उधाण आणले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता शिंदेंच्या पुढील राजकीय लक्ष्यावर आमदार आहेत की नगरसेवक, याबाबत तर्क-वितर्कांना वेग आला आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांनी मतदारांची माफी मागण्यास सुरुवात केली आहे. तसेच, संघटनात्मक एकजूट कायम ठेवण्यासाठी आज त्यांनी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी 2.30 वाजता शिवालय येथे ही बैठक पार पडणार असून, विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या बैठकीत पक्षातील सहा खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच आमदारांमध्ये एकजूट कायम राहावी आणि संघटनात्मक बांधिलकी अधिक मजबूत व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासोबतच पक्षातील आमदारांमध्ये कोणतीही नाराजी किंवा अस्वस्थता आहे का, याचाही आढावा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना कोणता संदेश देतात, पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात कोणत्या सूचना करतात आणि पक्षाची पुढील रणनीती काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची ‘डिनर डिप्लोमसी’ पार पडणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक उद्या संध्याकाळी एमसीए क्लबमध्ये आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमाचे आयोजन ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आले आहे.
अलीकडील खासदारांची फूट, विधान परिषद निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. महाविकास आघाडीतील समन्वय, पुढील राजकीय रणनीती आणि विरोधी पक्षांची भूमिका यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या ‘डिनर डिप्लोमसी’कडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, बैठकीतून कोणते राजकीय संकेत दिले जातात याबाबत उत्सुकता वाढली आहे.