भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळण्यामागचं नेमकं कारण समोर; गणपतीची मूर्ती अचानक का कोसळली? मोठा खुलासा!
काही दिवसांपूर्वी मुंबईत भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली होती. २२ फूट उंचीची गणेशमूर्ती मंडळात आणली जात असताना अचानक कोसळली. या दुर्घटनेत मंडळाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले होते. मंडपापासून अवघे ५० ते ६० मीटर अंतर बाकी असताना ही दुर्घटना घडली.
या घटनेनंतर गणेशमूर्ती नेमकी कशी कोसळली, याचा तपास एल. टी. मार्ग पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवले असून, मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि प्रत्यक्षदर्शी अशा सुमारे १५ ते २० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी भुलेश्वरच्या राजाची मूर्ती तयार करणारे शिल्पकार अनिकेत देसाई यांचाही जबाब नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, देसाई यांची बकरी अड्डा परिसरात तात्पुरती कार्यशाळा असून, मंडळाने दिलेल्या तपशीलानुसार त्यांनी ही मूर्ती तयार केली होती. विशेष म्हणजे, २२ फूट उंचीची गणेशमूर्ती तयार करण्याचे काम त्यांनी पहिल्यांदाच हाती घेतले होते. यापूर्वी त्यांनी कामाठीपुरा येथील एका मंडळासाठी १९ फूट उंच मूर्ती तयार केली होती.
दरम्यान, शिल्पकार अनिकेत देसाई यांच्या जबाबातून या दुर्घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कार्यशाळेतून बाहेर काढल्यानंतर अवघ्या १५० मीटर अंतरावर मूर्तीच्या मागील बाजूचे वेल्डिंग तुटले होते. त्यानंतर मूर्ती पुन्हा कार्यशाळेत आणून तिचे वेल्डिंग करण्यात आले आणि त्यानंतर ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून पुढे नेण्यात आली.
आतापर्यंतच्या पोलिस तपासानुसार, मूर्तीच्या मागील बाजूचे वेल्डिंग तुटल्यामुळे तिचा तोल गेला आणि त्यानंतर ही २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेमागील नेमकी जबाबदारी आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.