मुंबई बँकेवर शिंदेंचा डोळा; नव्या राजकीय समीकरणांना मिळणार बळ?
मुंबई बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाची एन्ट्री; फडणवीस-दरेकरांच्या वर्चस्वाला आव्हान?
प्रतिनिधी : निवृत्ती बाबर
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. डिसेंबर किंवा जानेवारीदरम्यान ही निवडणूक होण्याची शक्यता असून, या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गट आमनेसामने येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई बँकेच्या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. सध्या मुंबई बँकेवर भाजप आणि फडणवीस समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या संभाव्य प्रवेशामुळे सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील सहकारी संस्था या केवळ आर्थिक व्यवहारांची केंद्रे नसून त्यांना राजकीय प्रभावाची महत्त्वाची केंद्रे मानले जाते. मुंबई बँकेचे महत्त्वही याच कारणामुळे मोठे आहे. मुंबईतील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना बँकेकडून आर्थिक मदत मिळते. विशेषतः सेल्फ-रिडेव्हलपमेंट प्रकल्पांसाठी बँकेची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे कर्जवाटप, आर्थिक व्यवहार आणि विविध संस्थांशी असलेल्या संबंधांमधून मोठे नेटवर्क उभे राहते.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन तसेच विविध सार्वजनिक संस्थांच्या ठेवी हाताळल्या जात असल्याने बँकेचे आर्थिक महत्त्वही मोठे आहे. बँकेच्या कर्ज आणि अॅडव्हान्सची रक्कम सुमारे 6,437 कोटी रुपये असल्याचा दावा केला जातो. तसेच दरवर्षी 600 ते 700 कोटी रुपयांहून अधिक कर्जवाटप होत असल्याचे सांगितले जाते.
दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान?
2021 मध्ये प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने मुंबई बँकेच्या संचालक मंडळाच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवत क्लीन स्वीप केला होता. या विजयानंतर मुंबई बँकेवरील दरेकरांचा प्रभाव आणखी मजबूत झाला.
मात्र, आता शिंदे गटाने स्वतंत्रपणे उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी केल्यास दरेकरांच्या वर्चस्वाला थेट आव्हान निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना महायुतीचा भाग असतानाही सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत दोन्ही गटांमध्ये शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई बँकेची निवडणूक अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मुंबईतील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणे बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्याच्या संचालक मंडळात विविध राजकीय पक्षांशी संबंधित नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये आमदार सुनील राऊत आणि तेजस्विनी घोसाळकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणते गट एकत्र येतात आणि कोणत्या नव्या राजकीय आघाड्या तयार होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.