Operation Tiger Part 2: ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या रडारवर; महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहूल
Operation Tiger Part 2: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा
प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नवरात्रीआधी मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. ठाकरेंचे तब्बल 14 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. या संभाव्य पक्षप्रवेशाची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा वेग आल्याचे चित्र आहे. एकीकडे मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील 14 आमदारांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर या कथित ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यातील काही आमदारांना सत्तेत महत्त्वाची पदे आणि चांगली खाती मिळण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यापैकी सुमारे पाच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचा दावा केला जात आहे. तर काही आमदारांना महामंडळाचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रीपद देण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
जर नवरात्रीपूर्वी या आमदारांचा शिंदे गटात प्रवेश झाला, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संभाव्य राजकीय घडामोडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापौरपदासाठी शिंदे गटाची रणनीती?
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठीही शिंदे गटाने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात आहे. महापालिका निवडणुकीनंतर महायुतीच्या बैठकीत भाजपकडून शिंदे गटाला महापौरपदाबाबत शब्द देण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
त्यानुसार, ठराविक कालावधीनंतर शिंदे गटाला महापौरपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वतंत्र रणनीती आखली जात असल्याचेही सांगितले जात आहे.
ठाकरेंच्या सहा खासदारांनंतर आता आमदारांची चर्चा
काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटाला साथ दिल्याचा दावा करण्यात आला होता. मशाल चिन्हावर निवडून आलेल्या या खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या खासदारांनी संसदेत स्वतंत्र गट स्थापन केल्याचीही चर्चा झाली होती.
आता पुन्हा ठाकरे गटातील आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटासमोरील आव्हान वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.