एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल
एकनाथ शिंदेंच्या लंडन दौऱ्यात मोठी घडामोड; OSD आणि फोटोग्राफरचे विमान झ्युरिकला डायव्हर्ट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय लंडन दौऱ्यावर आहेत. ब्रिटिश संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन विशेष कार्यक्रमांमध्ये त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. मात्र, या दौऱ्यादरम्यान एक महत्त्वाची घटना समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील OSD, फोटोग्राफर आणि अन्य अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लंडनच्या हिथ्रो विमानतळावर जाणारे विमान थेट झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे वळवण्यात आले. या अचानक झालेल्या विमान डायव्हर्शनमुळे उपमुख्यमंत्री कार्यालयातील सहा अधिकारी झ्युरिकमध्ये अडकले असल्याची माहिती मिळत आहे.
लंडनमध्ये पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित अधिकाऱ्यांना सकाळी सात वाजता लंडनला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने प्रवास करत असून त्यांचे विमान नियोजित वेळेनुसार लंडनला पोहोचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे यांचा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.
दरम्यान, 9 सप्टेंबर 2026 रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि कॅनव्हास फॉर केअर यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी शिंदे यांना या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण दिले आहे.
शिंदे यांच्या कार्यकाळातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांसारख्या लोककल्याणकारी आणि पारदर्शक उपक्रमांची दखल घेत हा सन्मान दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान संसदीय कला प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांच्या संकल्पनेवर आधारित तयार केलेली चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.
तसेच, 10 सप्टेंबर 2026 रोजी इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम यांच्या वतीने हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026: ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
हाऊस ऑफ कॉमन्समधील या परिषदेत शिंदे यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी ते महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन तसेच भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक संबंध यावर मार्गदर्शन करणार आहेत.