voicemaharashtralive.news

News Header

Sanjay Raut : 16 पानांच्या FIR मधील फक्त एकच पान बाहेर कसं आलं? दिशा सालियन प्रकरणात संजय राऊतांचा दोन नेत्यांच्या भेटीकडे इशारा

Tuesday, 15 September 2026, 10:34

Sanjay Raut : दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांचा मोठा दावा; ‘16 पानांच्या FIR मधील फक्त एकच पान बाहेर कसं आलं?’

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या FIR मध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांचा बचाव करत अनेक गंभीर दावे केले आहेत. राऊत म्हणाले, “मी कधीही आरोप करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतो. आम्ही लढतोय आणि लढत राहू. कोणत्याही अनैतिक दबावापुढे आम्ही झुकणार नाही. देशभरात अशा प्रकारची अनैतिक दबावाची प्रकरणं सुरू आहेत.”

“केंद्रातील सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. अशा घटना घडवून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा दावा राऊत यांनी केला.

दिशा सालियन प्रकरणावर बोलताना राऊत यांनी या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. “याच लोकांनी सोनिया गांधी, डीएमके कुटुंब, चंद्राबाबू नायडूंचं कुटुंब आणि ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबाविरोधात मोहिमा चालवल्या. आता ठाकरे कुटुंबाविरोधातही अशीच मोहीम सुरू आहे,” असं ते म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयाने दहाव्या अनुसूचीनुसार निर्णय घेतल्यास महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं आणि ठाकरे कुटुंब पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ शकतं. त्यामुळे हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसतं. सीबीआयने या प्रकरणाचा तटस्थपणे तपास करावा,” अशी मागणी राऊत यांनी केली.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत म्हणाले, “मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोणाचे वडील, भाऊ किंवा इतर व्यक्ती काय म्हणतात, यावर खटला उभा राहत नाही. काल कोण काय म्हणालं आणि आज कोण काय म्हणतं, आमच्यासाठी हा विषय संपला आहे. आम्ही लढू. आमचं संपूर्ण आयुष्य संघर्षात गेलं आहे. खोटे आरोप आणि बदनामी आमच्या वाट्याला आली आहे.”

शिवसेना कोणाची, याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचा संदर्भ देत राऊत यांनी दिशा सालियन प्रकरणाचा मुद्दा याच पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात असल्याचा दावा केला.

“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी होतील आणि त्याचा परिणाम देशभरात होऊ शकतो. त्यासाठी तटबंदी निर्माण करणं हा पहिला विषय असू शकतो. आम्ही डिलिमिटेशनला पाठिंबा देत नाही. त्यामुळे दबाव आणण्याच्या प्रयत्नाचा हा भाग असू शकतो,” असं राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रातील अन्यायाविरोधात आदित्य ठाकरे लढत आहेत. ते राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणं ते बाहेर काढत आहेत. त्यामुळेच हे प्रकरण बाहेर काढलं असावं. मात्र, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही,” असा दावा राऊत यांनी केला.

दरम्यान, FIR लीक झाल्याच्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. “सर्व बातम्या मॅनेज आहेत. 16 पानांच्या FIR मधून फक्त एकच पान बाहेर कसं येतं आणि त्याच पानाच्या बातम्या केल्या जातात?” असा सवाल त्यांनी केला.

पुढे राऊत यांनी सह्याद्री अतिथीगृहातील एका बैठकीचा उल्लेख करत दावा केला की, “रविवारी सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर दोन मोठे नेते एकाच गाडीतून प्रवास करून एशियाटिक लायब्ररीत गेले. त्या बैठकीत आणि प्रवासादरम्यान ठरल्याप्रमाणे FIR लिहिला गेला आणि त्यातील एक कागद बाहेर आणला गेला,” असा दावा संजय राऊत यांनी केला.

More from this category

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे पदवीधर मतदारसंघ निकाल अपडेट : मतमोजणीपूर्वीच पुण्यात गोंधळ! सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटले; मतदान नेमकं कोणाचं?

रामदास कदमांचा एकनाथ शिंदेंना फोन; थेट आरोप करत म्हणाले, “आपला कोण…”

मुंबईत ATS ची कारवाई; जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याच्या संशयावरून माहिममधून एकाला अटक

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा