मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis : जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 20व्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.
“मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले याचा आनंद आहे. आम्ही त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. एका मागणीमध्ये कायदेशीर अडचण असल्याने ती मान्य करता आली नाही, याबाबत त्यांना माहिती देण्यात आली,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सबकमिटीने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारकडून आवश्यक बैठका घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. “यातील काही निर्णय प्रशासकीय स्वरूपाचे आहेत. सरकार निश्चितपणे सकारात्मक आहे. आमचे दरवाजे उघडे आहेत. मराठा समाजासाठी आमच्या सरकारने जेवढे निर्णय घेतले, तेवढे निर्णय यापूर्वी कोणी घेतले नाहीत,” असे ते म्हणाले.
“मराठा समाजाला जे काही मिळाले, ते आमच्या काळात मिळाले आहे. उपोषण संपले याचा आनंद आहे. विखे पाटील, प्रसाद लाड आणि एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. या सर्वांनी खूप मदत केली. सणासुदीच्या काळात कोणतेही विघ्न न येता हे आंदोलन संपले,” असेही फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. “महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती सुरू आहे. विकसित भारताचे स्वप्न नक्कीच पूर्ण करू. जनतेची सेवा विविध माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि जनतेला आवश्यक असलेल्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू,” असे फडणवीस म्हणाले.