Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात वडील सतीश सालियन यांचा मोठा निर्णय; आज नोटीस घेऊन स्वतः थेट…
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत; वडील सतीश सालियन आज मातोश्रीवर जाणार
मुंबई : दिशा सालियन प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली असून, सतीश सालियन यांचा जबाब नोंदवल्यानंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र, एफआयआरमध्ये नाव असणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी असल्याचे सिद्ध होत नाही.
या पार्श्वभूमीवर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली असून, संबंधित वक्तव्यांबाबत माफी मागावी आणि ती मागे घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सतीश सालियन हे ही नोटीस स्वतः देण्यासाठी आज, 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षा व्यवस्थेची मागणी केल्याचे वृत्त आहे.
दिशा सालियन प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर करण्यात येणारे आरोप फेटाळले आहेत. दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलो नसल्याचे सांगत, गेल्या काही वर्षांपासून राजकीय हेतूने आपले नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात आपल्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्या वक्तव्यांमुळे आपल्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या प्रयत्नांना राजकीय हेतू असल्याचे चित्र निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवरून आता कायदेशीर आणि राजकीय पातळीवर पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
दिशा सालियन प्रकरणातील तपास सध्या सुरू असून, तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.