तुकाराम मुंढे यांच्या बदलीवर मोठं वक्तव्य; म्हणाले, “बदली माझ्या हातात…”
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, “पुढची बदली कुठे होईल, हे माझ्या हातात नाही”
मुंबई : एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यभरातील भेसळखोरांविरोधातील कारवायांमुळे चर्चेत आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधातही प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार स्वीकारल्यानंतर भेसळखोरीविरोधातील कारवायांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. विविध हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून संबंधित व्यक्ती आणि संस्थांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
या कारवायांमुळे तुकाराम मुंढे यांची राज्यभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या बदलीबाबतही काही काळापासून विविध चर्चा सुरू होत्या. तुकाराम मुंढे यांची बदली होऊ नये, अशी मागणी काही नागरिकांकडून केली जात असल्याचेही पाहायला मिळाले.
बदलीबाबत तुकाराम मुंढे काय म्हणाले?
नुकत्याच दिलेल्या एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांना एफडीएमधून बदली झाल्यानंतर कोणता विभाग मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “पुढची बदली कुठे होईल, हे माझ्या हातात नाही. सरकारकडून जो विभाग दिला जाईल, त्या विभागात मी काम करेन,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, आपण भविष्याचा फारसा विचार करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या ज्या पदावर जबाबदारी आहे, त्या ठिकाणी चांगले काम करून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो, असे त्यांनी सांगितले.
“सर्वांनी भविष्याची चिंता सोडून वर्तमानात जगायला पाहिजे,” असेही तुकाराम मुंढे यांनी म्हटले.
कामचुकारपणावरही स्पष्ट भूमिका
अधिकारी किंवा कर्मचारी कामचुकारपणा करत असतील तर त्याबाबत तडजोड करण्याचे कारण नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्यांबाबत सहानुभूती दाखवण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दूध भेसळीवरही कारवाईचा भर
दरम्यान, दुधातील भेसळीच्या प्रश्नावरही तुकाराम मुंढे यांनी भाष्य केले. दूध आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून विविध उपाययोजना आणि तपासणी मोहीम राबवली जात आहे.
तुकाराम मुंढे यांच्या यापूर्वीही अनेकदा बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढील बदलीबाबतही विविध चर्चा सुरू होत्या. काही काळापूर्वी त्यांची राजस्थानमध्ये बदली होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, त्यांच्या ताज्या वक्तव्यानुसार पुढील बदली कुठे होणार, याबाबतचा निर्णय त्यांच्या हातात नसून सरकारकडून देण्यात येणाऱ्या जबाबदारीनुसार ते काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.