मोठी बातमी! सौरव दास आणि आशुतोष रांका पुन्हा पोलिसांच्या ताब्यात; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे पुन्हा ताब्यात
दिल्ली पोलिसांनी आज पुन्हा एकदा मोठी कारवाई करत कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे नेते सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांसोबत त्यांच्या काही सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कृतीवर निषेध व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही नेते आपल्या काही समर्थकांसह दिल्लीतील जंतरमंतर परिसरात पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. संबंधित परिसरात जमावबंदी लागू असल्याने आणि तिथे जाण्यासंदर्भात निर्बंध असतानाही हे नेते घटनास्थळी पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.
आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर
आशुतोष रांका आणि सीजेपीच्या वतीने या कारवाईचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सीजेपीचे नेते आणि समर्थक जंतरमंतर परिसरात पोहोचल्याचं दिसत आहे. काही समर्थक हातात पक्षाचे झेंडे घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करताना दिसतात. त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात येत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या निर्बंधांवरून नाराजी
दरम्यान, सरकारने आंदोलनासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीतून जंतरमंतरचं नाव वगळल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनासाठीच्या ठिकाणांवर निर्बंध आणि नेत्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईमुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं असून, पोलिसांच्या कारवाईवरून पुढे काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.