voicemaharashtralive.news

News Header

भारताला ज्याची भीती होती तेच घडणार? पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता, थेट तेलाच्या किमतींचा परिणाम

Tuesday, 08 September 2026, 10:30

भारताला पुन्हा महागाईचा धक्का? पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक बाजारपेठेवर दिसू लागला आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत असून, त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे.

इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून दोन्ही देशांकडून हल्ले सुरू आहेत. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढते आणि त्याचा परिणाम तेलाच्या किमतींवर होतो. यापूर्वीही दोन्ही देशांमधील संघर्षाच्या काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली होती.

आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने भारताची चिंता वाढली आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे 1.5 टक्क्यांची वाढ झाली असून, दर प्रति बॅरल 97.88 डॉलरवर पोहोचला आहे. 23 जुलैनंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या दरात एवढी मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

हा संघर्ष पुढील काही दिवस कायम राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम भारताच्या इंधन आयातीच्या खर्चावर होऊ शकतो. भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची आयात करत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.

भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाच्या मिश्रणाची सरासरी किंमतही वाढली आहे. सध्या भारत सुमारे 99.38 डॉलर प्रति बॅरलच्या सरासरी दराने कच्चे तेल खरेदी करत आहे. गेल्या शुक्रवारी हा दर 101 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला होता. तुलनेत जूनमध्ये इंडियन बास्केटची सरासरी किंमत 83 डॉलर, जुलैमध्ये 82 डॉलर आणि ऑगस्टमध्ये 90 डॉलर प्रति बॅरल होती.

अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकांविरोधात इराणकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर झाल्यानंतर संघर्ष आणखी तीव्र झाला. त्यानंतर अमेरिकन लष्कराकडून इराणशी संबंधित तीन तेल टँकर्सवर कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या बाजारात अस्थिरता वाढली असून तेलाच्या किमतींवर त्याचा परिणाम झाला आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय तेल कंपन्यांवरील दबावही वाढत आहे. सध्या तेल कंपन्यांकडून देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत राहिल्यास त्याचा परिणाम भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे इराण-अमेरिका संघर्षाचा पुढील काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतींवर काय परिणाम होतो, याकडे भारताचे आणि तेल बाजाराचे लक्ष लागले आहे. संघर्ष अधिक तीव्र झाल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

More from this category

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”

पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय

अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा