केतन अग्रवाल हत्याकांड : हत्येपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल, पार्टीतील क्षणांनी वेधले लक्ष
पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन यांनी लग्न टाळण्यासाठी त्याला लोहगड किल्ल्यावरून ढकलल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
दरम्यान, केतनच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी केली जात असताना सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केतन आनंदाने नाचताना आणि आनंदी क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कुटुंबीयांच्या दुःखात आणखी भर पडली असून, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अवघ्या चार महिन्यांपूर्वी केतनचा साखरपुडा पार पडला होता आणि काही महिन्यांवरच त्याचे लग्न येऊन ठेपले होते. घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती. कुटुंबीय आनंदात आगामी सोहळ्याची तयारी करत होते. मात्र, 18 जूनचा दिवस अग्रवाल कुटुंबासाठी दुःखाचा डोंगर घेऊन आला.
होणाऱ्या पत्नीसमवेत लोहगड किल्ल्यावर गेलेला केतन पुन्हा कधीच घरी परतणार नाही, याची कुणालाही कल्पना नव्हती. लोहगडावर घडलेल्या घटनेत त्याचा मृत्यू झाला आणि काही क्षणांतच आनंदाने भरलेले कुटुंब शोकसागरात बुडाले.
लग्नाच्या उत्साहाने भरलेल्या घरावर अचानक दुःखाचे सावट पसरले. कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद नाहीसा झाला आणि आपल्या लाडक्या मुलाच्या निधनाने संपूर्ण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक केली असून, तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सियाला केतनसोबत विवाह करायचा नव्हता. त्यामुळेच त्याच्यापासून कायमची सुटका करण्याचा कट रचल्याचा आरोप तिच्यावर आहे. 18 जून रोजी वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पूर्वनियोजनानुसार चेतन चौधरी देखील त्या ठिकाणी पोहोचला होता. त्यानंतर निर्जन परिसराचा फायदा घेत केतनला दरीत ढकलल्याचा आरोप दोघांवर आहे. सुमारे 400 फूट खोल दरीत पडल्याने केतनचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी सिया आणि चेतन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून, पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अनेक संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच, आरोपी सिया आणि चेतन चौधरी यांचीही सातत्याने चौकशी सुरू असून, कथित कटामागील कारणे, नियोजनाची प्रक्रिया आणि संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.
तपासाचा भाग म्हणून घटनास्थळी सीन रिक्रिएशनही करण्यात आले आहे. यासाठी प्रथम सियाला आणि त्यानंतर बुधवारी (1 जुलै) चेतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले, जिथे घटनेचा क्रम पुन्हा तपासण्यात आला.
हत्येपूर्वीचा कौटुंबिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, मृत केतन अग्रवाल याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केतन आणि सियाच्या कुटुंबीयांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे.
7 मे रोजी झालेल्या या कार्यक्रमात केतन, त्याचे आई-वडील, सियाचे आई-वडील आणि इतर कुटुंबीय आनंदाने गाण्यांवर नृत्य करताना दिसत आहेत. सर्वजण आनंदी वातावरणात कार्यक्रमाचा आनंद घेत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत असून, तो पाहिल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसेच, प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.