voicemaharashtralive.news

News Header

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता? आणखी दोन पक्षांचे खासदार फुटणार, बड्या नेत्याचा मोठा दावा!

Saturday, 27 June 2026, 10:52

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडीतील दोन पक्षांचे काही खासदार फुटण्याची शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील तब्बल सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. खासदारांच्या फुटीनंतर आक्रमक भूमिका घेत त्यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडू शकतात, असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढील काळात एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील तसेच सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील काही खासदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केला. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

आमदार रोहित पवार यांनी सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे. या मागणीसाठी ते राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत असून, शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्यातील आगामी राजकीय घडामोडींवरही भाष्य करत मोठा दावा केला.

रोहित पवार म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत अडचण उद्धव ठाकरे यांची नसून एकनाथ शिंदे यांची आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला आणखी ४१ खासदारांची आवश्यकता आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांचाही विचार केला जात असून, आणखी काही खासदार फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो,” असा दावा त्यांनी केला.

रोहित पवार म्हणाले, “भाजपला सध्या केवळ आवश्यक संख्याबळ हवे आहे. त्यामुळे सध्या खासदारांना महत्त्व आहे. मात्र, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यानंतर खासदारांचे राजकीय महत्त्व कमी होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्वी ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा पक्ष, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांचा पक्ष आहे.”

ते पुढे म्हणाले, “जर भाजपने ‘एकला चलो रे’ची रणनीती स्वीकारली, तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षांतील काही खासदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. सध्या भाजपचे एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेम हे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सत्ता कायम राखण्यासाठी आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील खासदार भाजपमध्ये जातील,” असा दावा रोहित पवार यांनी केला.

रोहित पवार यांच्या या दाव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

More from this category

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण

अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा