Manoj Jarange : जालन्यात 10-11 समर्थकांवर गुन्हे दाखल; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या 10 ते 11 समर्थकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गेवराई दौऱ्यादरम्यान त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित झाल्यानंतर त्यांच्या काही समर्थकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काही जण फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्राम चॅनेल चालवतात, तर काही जण सोशल मीडियावर कमेंट करणारे समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे.
अंबड पोलीस ठाण्यात मनोज जरांगे समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणे तसेच एका महिलेवर अश्लील आरोप करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपावरून आतापर्यंत 10 ते 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील सक्रिय महिला आंदोलक ललिता तारख यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ललिता तारख यांनी यापूर्वी दोन वेळा पोलिसांकडे तक्रार करून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पाच जणांसह आणखी पाच ते सहा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भगवानराव जाधव, डी. ए. उंबरे पाटील, विभीषण लिंबाजी नन्नावरे, बळीराम मोरे आणि संतोष पाटील राहटिकर अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या संघर्षाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “एक महिना उपोषणात होतो. महिनाभर माझ्या घरी भाजी नव्हती. नाव मोठं झालंय, मागायचं कोणाला? मी घरात नाही, तर बायको आणि लेकराने कोणाच्यातरी बांधावर कामाला जायचं आणि तीनशे रुपये मिळवायचे. ही हालअपेष्टा समाजाच्या लेकराबाळांसाठी मनोज जरांगेंनी सहन केली आहे.”
“गरीब मराठ्यांचं आंदोलन श्रीमंत मराठ्यांच्या जीवावर सुरू आहे. मला बसायला गाडी देतात. त्यांच्यावर केसेस होतात, माझ्यासोबत राहणाऱ्यांवर दंड आणि चौकशा होतात,” असंही जरांगे यांनी म्हटलं.
तसंच, “मला वाकून, शरण जाऊन जगायचं नाही. तुमच्या लेकराबाळांचं रक्त विकून जर मी पैशावाला झालो, जर मी पदं घेतली, तर आयुष्यात मला सुखाची झोप येणार नाही,” असं मनोज जरांगे पाटील यांनी गेवराईतील साठेवाडी येथे बोलताना सांगितलं.