मोठी बातमी! अभिजीत दिपके दिल्लीला पोहोचण्याआधीच दोन बड्या नेत्यांची थेट तुरुंगात रवानगी; सकाळीच घडली मोठी घडामोड!
अभिजीत दिपके दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच मोठी घडामोड; दोन नेत्यांची पाच दिवसांसाठी तुरुंगात रवानगी
सीजेपीला मोठा धक्का बसला आहे. अभिजीत दिपके दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच संघटनेच्या तीन नेत्यांना पोलिसांनी अटक केली असून, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांच्या तुरुंगवासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.
आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. जंतरमंतर येथे काल आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना रात्री उशिरा अटक केली होती.
जंतरमंतरवरील प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेश करणे आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय, सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्यपालनात अडथळा आणल्याचाही आरोप असल्याचे समोर आले आहे.
आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दुसऱ्यांदा अटक
आशुतोष रांका आणि सौरव दास यांना यापूर्वीही दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी काही नियम आणि अटींच्या अधीन राहून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यांनी पुन्हा जंतरमंतर येथे जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर पुन्हा कारवाई केली.
रत्ना सिंग यांनीही या प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. दिल्ली पोलिसांनी सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना अटक केल्याची माहिती त्यांनी या पोस्टमधून दिली. तिघांवर अनधिकृत प्रवेश, बंधपत्रातील अटींचे उल्लंघन आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचे आरोप असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभिजीत दिपके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
या घडामोडींनंतर अभिजीत दिपके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिजीत दिपके आज नागपूरहून दिल्लीला रवाना होणार असून, ते दुपारपर्यंत दिल्ली विमानतळावर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याचे सांगितले जात आहे.
सीजेपीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर झालेल्या या कारवाईनंतर अभिजीत दिपके दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात, तसेच या प्रकरणावर त्यांची पुढील प्रतिक्रिया काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.