voicemaharashtralive.news

News Header

MPSC Paper Leak: पेपरफुटीसाठी किती लाखांची डील? ऋतुजा पाटीलच्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा

Friday, 28 August 2026, 10:53

MPSC Drug Inspector Exam Paper Leak: पेपरफुटीमागे 50 लाखांची डील? ऋतुजा पाटीलच्या चॅट्समधून नवा दावा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या कथित ‘लव्ह अँड हेट स्टोरी’मुळे या प्रकरणाचा उलगडा झाला असला, तरी आता या प्रकरणामागील आर्थिक व्यवहारही तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे.

ऋतुजा पाटील हिचे आणखी एक कथित व्हॉट्सॲप संभाषण समोर आले आहे. मैत्रिणीसोबत झालेल्या या संभाषणात पेपरफुटीसाठी मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आल्याचे समोर येत आहे. या नव्या माहितीमुळे प्रकरणाला आर्थिक व्यवहाराचा आणखी एक महत्त्वाचा अँगल मिळाला आहे.

पेपरफुटीसाठी 50 लाख रुपये दिल्याचा दावा

अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर परीक्षा होण्यापूर्वी मिळवण्यासाठी 50 लाख रुपये दिल्याचे ऋतुजा पाटीलने मैत्रिणीला सांगितल्याचा दावा या कथित चॅट्समधून समोर आला आहे.

यापूर्वी पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पेपरफुटीचा व्यवहार 5 लाख रुपयांमध्ये झाल्याची माहिती समोर येत होती. मात्र, आता कथित चॅटमध्ये 50 लाख रुपयांचा उल्लेख आल्याने तपास यंत्रणांसमोरही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तीन अधिकारी सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. अशा परिस्थितीत 50 लाख रुपयांच्या दाव्यामुळे या आर्थिक व्यवहाराचा नेमका तपशील काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पेपर प्रत्यक्षात 5 लाख रुपयांत फुटला की त्यासाठी त्याहून मोठी रक्कम खर्च करण्यात आली होती, याचा तपास आता केला जात आहे.

12 लाखांच्या व्यवहाराचाही तपास

या प्रकरणात पैशांच्या देवाणघेवाणीचा आणखी एक धागा तपास यंत्रणांना मिळाला आहे. प्रवीण पाटीलकडून पैशांची मागणी होत असल्याने अमृत पाटील चिंतेत असल्याचे ऋतुजाने मैत्रिणीला सांगितल्याचे कथित संभाषणातून समोर आले आहे.

प्राथमिक चौकशीत अमृत पाटील यांनी प्रवीण पाटीलला 12 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. अमृत पाटील आणि प्रवीण पाटील यांच्यातील संपर्काचा दुवा म्हणून मयूर ठाकरे हे नावही तपासात समोर येत आहे.

ऋतुजाच्या कथित संभाषणातून मिळालेल्या या धाग्यांच्या आधारे पोलीस मयूर ठाकरे यांच्यासह अन्य संशयितांचा शोध घेत असून, आर्थिक व्यवहाराची साखळी नेमकी कुठपर्यंत पोहोचते, याचा तपास सुरू आहे.

ते 78 प्रश्न कुणाला पुरवले?

औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात एकूण 294 प्रश्नांपैकी प्रत्यक्षात किती प्रश्न आणि कोणकोणत्या उमेदवारांना पुरवण्यात आले, याचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे.

यासाठी आरोपींच्या मोबाईलमधील कथित व्हॉट्सॲप संभाषण, संदेश आणि इतर डिजिटल माहितीची तपासणी केली जाणार आहे. प्रवीण पाटीलसह दोघांनी परीक्षा झाल्यानंतर नवीन मोबाईल घेतल्याचेही तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ऋतुजा पाटीलला कथितरित्या पुरवण्यात आलेल्या प्रश्नांपैकी 78 प्रश्न परीक्षेत आले असल्याचे तपासात उघड झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रश्न नेमके कुणाकडून मिळाले, आणखी किती उमेदवारांना त्याचा फायदा झाला आणि या संपूर्ण प्रकरणामागे किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

More from this category

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”

पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय

अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा