voicemaharashtralive.news

News Header

Mumbai-Pune Expressway : मिसिंग लिंक प्रकल्पात स्लॅब कोसळला; एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवर परिणाम

Tuesday, 07 July 2026, 13:25

Mumbai Pune Expressway Missing Link : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. लोणावळा आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

गेल्या दोन दिवसांत लोणावळा, तळेगाव आणि आसपासच्या भागात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे मिसिंग लिंकच्या प्रवेशभागातील एक मोठा स्लॅब कोसळला असून, त्यानंतर डोंगरावरील माती आणि दगडराडा मार्गावर पडत असल्याचे दिसून आले आहे.

या घटनेचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, महामार्गावरील वाहनांची हालचाल अत्यंत संथ गतीने सुरू आहे. परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना शक्य असल्यास सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक उर्से टोलनाक्यावर तात्पुरती रोखण्यात आली असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, द्रुतगती महामार्गावरील फूड मॉल परिसरातही पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच खोपोलीजवळील पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आसपासच्या भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी पाणी शिरल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

यापूर्वीही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या रस्त्यावर खड्डे पडल्याची छायाचित्रे समोर आली होती. त्यानंतर या प्रकल्पाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने बांधलेल्या रस्त्यांना पूर्णपणे स्थिर होण्यासाठी काही कालावधी लागतो, तसेच पहिल्या पावसात विविध तांत्रिक बाबींची चाचणी होत असते. त्यानंतर आवश्यक दुरुस्ती आणि पुढील स्तराचे काम केले जाते, असे स्पष्टीकरण दिले होते.

प्रशासनाकडून प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे–मुंबई द्रुतगती महामार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रशासनाने दोन्ही दिशांतील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवास करणे आवश्यक असल्यास प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करूनच प्रवास करावा, असेही सांगण्यात आले आहे.

परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Heavy Rain Maval : मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पाटण गावात रविवारी (6 जुलै) पहाटे एक गंभीर दुर्घटना घडली. डोंगराचा काही भाग घसरून एका घरावर दरड कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील कुटुंबातील काही सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, मावळचे तहसीलदार घटनास्थळी पोहोचून बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) मदतीची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील NDRF च्या 5व्या बटालियनचे 30 सदस्यीय पथक आवश्यक बचाव साहित्यांसह सकाळी 5.50 वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. या पथकात एक अधिकारी, दोन वरिष्ठ अधिकारी आणि 27 जवानांचा समावेश आहे.

सध्या युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम सुरू असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची अधिकृत पुष्टी झालेली नसून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

More from this category

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण

अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा