ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”
लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; “ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न” म्हणत जरांगेंच्या अटकेची मागणी
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर काल हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोलापूरमधील एका हॉटेलमध्ये तीन ते चार तरुणांनी हाके यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देत मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाची भूमिका घेतली आहे. हल्ल्यानंतर बोलताना हाके यांनी हा हल्ला ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. तसेच, “हा माझ्यावर झालेला अकरावा हल्ला आहे. हा भ्याड हल्ला होता,” असे त्यांनी म्हटले.
हाके यांच्या म्हणण्यानुसार, हल्ला करणारे तरुण हे जरांगे यांचे कार्यकर्ते होते. ओबीसी नेत्यांवर हल्ले करून किंवा शिवीगाळ करून आरक्षण मिळवता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने संबंधित लोक कायद्याला जुमानत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
या घटनेवरून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “फडणवीस यांनी तुमच्या मानगुटीवर बसलेले भूत आवरा आणि त्याला आत टाका. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा,” अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. यासोबतच मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.
घटनेबाबत अधिक माहिती देताना हाके म्हणाले की, ते जेवण्यासाठी हॉटेलमध्ये थांबले होते आणि त्यांच्यासोबत 10 ते 12 पोलीस कर्मचारी होते. त्यावेळी एक व्यक्ती सुरुवातीला व्हिडीओ शूट करत होती, तर काही जण त्यांच्याशी हुज्जत घालत होते. परिस्थिती पाहता हॉटेलचे दार लावून त्यांनी जेवण केले. संबंधित तरुण दारूच्या नशेत असल्याचा आरोपही हाके यांनी केला.
यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्याबाबतच्या एका घटनेचाही उल्लेख केला. पोलिसांचा बंदोबस्त असूनही काही जण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.
“तू मुंबईत न जाता दिल्लीत जा. तू निझामच्या देशात नाहीस; इथे संविधानाचे पालन करावे लागते,” असे म्हणत हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. तसेच, “याला अटक करा,” अशी मागणी त्यांनी केली.
लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगली जात असून, या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.