voicemaharashtralive.news

News Header

Raj Thackeray : ‘गर्दी होते, मग मतं कुठे जातात?’; निवडणूक आयोगातील वादावर राज ठाकरेंचा थेट सवाल

Thursday, 24 September 2026, 10:54

Raj Thackeray : ‘सभेला गर्दी होते, मग मतं कुठे जातात?’; निवडणूक आयोगातील वादावर राज ठाकरेंची बोचरी पोस्ट

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावरून सध्या देशाच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याची बातमी समोर आल्यानंतर विरोधकांकडून आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्ताचा संदर्भ देत निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी नोंदवलेल्या आक्षेपांकडे लक्ष वेधले. “तुम्ही मतदान करता, तुम्हाला बदल हवा असतो; पण तो बदल कधीच का मिळणार नाही, याची उत्तरं या बातमीत सापडतील,” असं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी दावा केला की, गेल्या दहा महिन्यांत सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी १४ वेळा निवडणूक आयोगाच्या कारभारावर ऑन-रेकॉर्ड आक्षेप नोंदवले. मतदार नोंदणी, मतदारांची नावं वगळणे आणि मतदारयादीशी संबंधित सॉफ्टवेअरच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचं राज ठाकरे यांनी नमूद केलं.

त्यांनी पुढे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आयोगातील दोन आयुक्तांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष होत असेल, तर आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात, असा दावा त्यांनी केला.

‘निर्णय घेण्यासाठी दबाव होता’

राज ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत, “खरं तर त्यांना ते निर्णय घ्यायला लावले जात होते,” असा आरोप केला. तसेच त्यांच्या मते या निर्णयांमागे नेमकं कोण होतं, याची चौकशी होण्याची गरज आहे.

मतदारयादीतील बदल, एसआयआर फॉर्म आणि स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकारांशी संबंधित मुद्द्यांचाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला. गोव्यात पात्र ठरलेल्या ९७ मतदारांची नावं सॉफ्टवेअरशी संबंधित अडचणीमुळे अंतिम यादीत समाविष्ट झाली नसल्याचा संदर्भ देत त्यांनी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

‘ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही’

राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच निवडणूक आयोगाच्या कारभाराची चौकशी करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.

यासोबतच त्यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्ताचं कौतुक करत, निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आक्षेप नोंदवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. पत्रकारितेच्या माध्यमातून हा मुद्दा समोर आणल्याबद्दल त्यांनी एक्स्प्रेस समूहाचंही कौतुक केलं.

ईव्हीएम आणि मतपत्रिकेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

राज ठाकरे यांनी पुढे ईव्हीएमचा मुद्दाही उपस्थित केला. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेसोबतच ईव्हीएमच्या वापराबाबत विरोधी पक्षांनी एकत्रितपणे भूमिका मांडावी आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी जनआंदोलन उभं करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

‘सरकारनेही राजीनामा द्यावा’

आपल्या पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवरही निशाणा साधला. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्या माध्यमातून निवडून आलेल्या सरकारच्या वैधतेवरही प्रश्न उपस्थित होतात, असा दावा त्यांनी केला.

‘सभेला गर्दी होते, मग मतं कुठे जातात?’

राज ठाकरे यांनी पोस्टच्या तळटीपेत विरोधकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा संदर्भ घेतला. “तुमच्या सभेला गर्दी होते, मग मतं कुठे जातात?” असा सवाल विचारणाऱ्यांना आता या संपूर्ण प्रकरणातून उत्तर मिळालं असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे मतदारांच्या मनातील शंका अधिक तीव्र झाल्याचंही त्यांनी सूचित केलं.

More from this category

मराठवाडा MLC निकाल: शिंदेंच्या नेत्यामुळे राष्ट्रवादीला धक्का? राजकीय समीकरणे बदलली; महायुतीत संघर्षाची शक्यता

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे पदवीधर मतदारसंघ निकाल अपडेट : मतमोजणीपूर्वीच पुण्यात गोंधळ! सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटले; मतदान नेमकं कोणाचं?

रामदास कदमांचा एकनाथ शिंदेंना फोन; थेट आरोप करत म्हणाले, “आपला कोण…”

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा