SRH vs CSK : हैदराबादमध्ये यलो आर्मीची अग्निपरीक्षा, तिसऱ्या विजयासाठी रंगणार महामुकाबला!
आयपीएल 2026 च्या 19 व्या हंगामात आज, शनिवारी 18 एप्रिल रोजी, डबल हेडरमधील दुसरा आणि एकूण 27 वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ तिसऱ्या विजयासाठी मैदानात उतरतील.
दोन्ही संघांनी आतापर्यंत 5 पैकी 2 सामने जिंकले असून 3 सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये आपली स्थिती मजबूत करण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हैदराबादची धुरा इशान किशनच्या खांद्यावर असणार असून चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. दोन्ही युवा कर्णधार आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी जोरदार रणनीती आखताना दिसतील.
हा सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार असून 7:00 वाजता टॉस होईल.
आकडेवारीनुसार चेन्नई सुपर किंग्सचा हैदराबादवर स्पष्ट दबदबा दिसून येतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 22 सामने झाले असून त्यापैकी चेन्नईने तब्बल 15 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादला केवळ 7 वेळा विजय मिळवता आला आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये दोन्ही संघांचे 4-4 गुण असले तरी नेट रनरेटमुळे हैदराबाद आघाडीवर आहे. हैदराबाद पाचव्या स्थानावर असून त्यांचा नेट रनरेट +0.576 आहे. तर चेन्नई आठव्या स्थानावर असून त्यांचा नेट रनरेट -0.846 इतका आहे.
आजच्या या रोमहर्षक सामन्यात कोणता संघ तिसऱ्या विजयाची नोंद करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.