voicemaharashtralive.news

News Header

तुकाराम मुंढेंना दणका! ‘मुंढे इफेक्ट’ हॉटेलच्या किचनमध्ये नव्हे, तर FDAच्या तिसऱ्या मजल्यावर दिसणे गरजेचे; थेट पत्र

Monday, 28 September 2026, 10:35

तुकाराम मुंढेंना संजय राऊतांचे थेट पत्र; FDAच्या कारभारावर उपस्थित केले गंभीर प्रश्न

तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू असून, त्यांच्या कारवाईचा व्यावसायिकांनी धसका घेतल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर काल खासदार संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले होते. मात्र, त्यानंतर राऊत यांनी FDAच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित करत मुंढे यांना थेट पत्र लिहिले आहे.

FDAमधील कारवाईचे कौतुक केल्यानंतर संजय राऊत यांनी याच विभागातील कथित गैरप्रकारांकडे लक्ष वेधले आहे. “आपण कारवाईचे श्रेय घेत असाल, तर स्वतःचा विभाग प्रथम स्वच्छ करा,” असे म्हणत राऊत यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर थेट टीका केली. तसेच, “‘मुंढे इफेक्ट’ केवळ हॉटेलच्या किचनमध्ये नव्हे, तर FDAच्या कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरही दिसणे गरजेचे आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

राऊत यांनी आपल्या पत्रातून FDAमधील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, FDAमधील सहायक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट तसेच क्विक-कॉमर्स व्यावसायिकांना परवाना निलंबित करण्याच्या धमक्या देऊन कथितरित्या मोठ्या प्रमाणात वसुली करत आहेत.

राऊत यांच्या पत्रानुसार, तुकाराम मुंढे FDAचे आयुक्त होण्यापूर्वी क्लोजिंग नोटीससाठी 10 ते 12 हजार रुपयांचा दर असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मुंढे यांच्या कारवाईनंतर हा दर 75 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत गेल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

FDAचे वांद्रे मुख्यालय आणि ठाणे कार्यालय कथित वसुलीचे केंद्र बनल्याचा आरोपही पत्रातून करण्यात आला आहे. ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांनी एका क्विक-कॉमर्स कंपनीचा निलंबित परवाना पुन्हा मिळवून देण्यासाठी 17 ते 18 लाख रुपये घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय, सोशल मीडियावरील एका उंदरासंदर्भातील पोस्टनंतर हॉटेलचा परवाना निलंबित केल्याचा उल्लेखही राऊत यांनी पत्रात केला आहे.

राऊत यांनी आपल्या पत्रातून FDAच्या कामकाजाबाबत काही मागण्याही केल्या आहेत. वांद्रे, ठाणे आणि इतर विभागांतील क्लोजिंग नोटिसचे कथित रेट कार्ड तसेच निलंबित परवाने पुन्हा सुरू करण्याच्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Customer Complaintच्या आधारे होणाऱ्या धाडींची पडताळणी बंधनकारक करावी आणि खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कायद्यानुसार नोटीस, सुनावणी आणि निलंबनाची प्रक्रिया टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या 17 ते 18 लाख रुपयांच्या कथित वसुलीच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करावी, तसेच प्रत्येक परवाना निलंबन आणि पुनर्स्थापनेमागील कारणे, तारखा आणि सुनावणीचा सारांश सार्वजनिक करावा, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

आता संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर आणि मागण्यांवर तुकाराम मुंढे तसेच FDA प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

More from this category

ठाकरे गटाचा मोठा निर्णय! दुपारी 3 वाजता नेमकं काय घडणार? राजकीय वर्तुळात खळबळ!

मराठवाडा MLC निकाल: शिंदेंच्या नेत्यामुळे राष्ट्रवादीला धक्का? राजकीय समीकरणे बदलली; महायुतीत संघर्षाची शक्यता

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे पदवीधर मतदारसंघ निकाल अपडेट : मतमोजणीपूर्वीच पुण्यात गोंधळ! सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटले; मतदान नेमकं कोणाचं?

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा