voicemaharashtralive.news

News Header

Tukaram Mundhe: सण-उत्सव साजरे करा, मात्र…; FDAच्या आदेशामागचा नेमका अर्थ तुकाराम मुंढेंनी केला स्पष्ट

Monday, 07 September 2026, 10:36

Tukaram Mundhe: सण-उत्सवांवर निर्बंध नाहीत, अन्नसुरक्षेसाठी FDAची मोहीम; तुकाराम मुंढेंनी केलं स्पष्ट

महाराष्ट्रात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) जारी केलेल्या नव्या निर्देशांबाबत काही गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. FDAने जारी केलेल्या सूचनांचा उद्देश सण-उत्सवांवर कोणतेही निर्बंध घालणे नसून, या काळात मोठ्या प्रमाणावर वितरित होणारं अन्न सुरक्षित आणि भेसळमुक्त राहावं, हा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सण-उत्सव, लग्नसमारंभ, भंडारे, ईद, ख्रिसमस, नववर्षाचे कार्यक्रम तसेच विविध सार्वजनिक मेळाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांचं वितरण केलं जातं. अशा ठिकाणी नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यावर FDAचा भर असल्याचं मुंढे यांनी सांगितलं.

“आम्ही उत्सवांचं नियमन करत नाही, तर उत्सवांमध्ये दिलं जाणारं अन्न सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करत आहोत,” अशी भूमिका तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केली.

अन्नभेसळीला आळा घालण्यासाठी FDAने संपूर्ण वर्षासाठी ‘फेस्टिव्हल एनफोर्समेंट कॅलेंडर’ तयार केलं आहे. या कॅलेंडरनुसार विविध सण, जत्रा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या कालावधीत अन्नपदार्थांची नियोजनबद्ध तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी एखादा सण जवळ आल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र सूचना जारी केल्या जात होत्या. मात्र, आता वर्षभरासाठी एकसमान आणि नियोजित तपासणी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल, मांस, फळं, सुका मेवा, उपवासाचे पदार्थ, पाणी आणि बर्फ, बेकरी उत्पादनं अशा जोखमीच्या खाद्यपदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. तपासणीदरम्यान भेसळ किंवा नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

यावेळी तुकाराम मुंढे यांनी अन्न व्यवसायाशी संबंधित परवाने आणि नोंदणीबाबतही महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं. अन्न व्यवसायासाठी नोंदणी आणि परवान्याशी संबंधित कायदेशीर चौकट 2011 पासून अस्तित्वात आहे. नव्या निर्देशांमुळे कोणताही नवीन कायदा, स्वतंत्र परवाना व्यवस्था किंवा सण-उत्सवांसाठी अतिरिक्त कायदेशीर निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याचा FDAचा कोणताही उद्देश नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांनी सण-उत्सव उत्साहात साजरे करावेत; मात्र या काळात वितरित होणारं अन्न सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त असावं, हाच या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

More from this category

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”

पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय

अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा