होर्मुजमध्ये तणाव शिगेला! भारतीय जहाजांवर गोळीबार, सरकारची तातडीची हालचाल सुरू
इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुज खाडीतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. 18 एप्रिल रोजी होर्मुज खाडीत दोन भारतीय ध्वजांकित जहाजांवर गोळीबार झाल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने मोठी पावले उचलली आहेत. या घटनेनंतर संबंधित जहाजांना पुन्हा बंदराकडे परतावे लागले
या घटनेला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेत इराणच्या राजदूतांना तातडीने पाचारण करून तीव्र निषेध नोंदवला. परराष्ट्र सचिव Vikram Misri यांनी इराणी दूतांची भेट घेऊन भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
सध्या होर्मुज खाडी परिसरात भारताची तब्बल 14 जहाजे अडकलेली असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्लॅन तयार केला आहे. यासाठी नौदलाच्या युद्धनौकांकडून एस्कॉर्ट ऑपरेशनही सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारचे प्राधान्य आता या सर्व जहाजांना आणि खलाशांना सुरक्षितपणे परत आणणे हेच आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते Randhir Jaiswal यांनी सांगितले की, होर्मुजजवळील भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी इराणी अधिकाऱ्यांशी सतत संपर्क सुरू आहे. युद्धविरामाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसल्याने खाडीतील तणाव कायम आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होताना दिसत आहे.