Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या दीड वर्षात मंत्र्यांनी केलेल्या कामांचा आता सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार असून, प्रत्येक विभागाच्या कामगिरीची समीक्षा करण्यात येणार आहे. या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या खात्यात राबवलेल्या विकासकामांचा, प्रलंबित निर्णयांचा तसेच जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. ज्या विभागांविषयी नागरिक किंवा लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या संदर्भात संबंधित मंत्र्यांकडून स्पष्टीकरणही मागितले जाऊ शकते. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक सर्व मंत्र्यांना बैठकीसाठी पाचारण केल्याने या बैठकीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
सरकारच्या कामकाजाला अधिक गती देणे, आगामी काळातील विकास आराखडा निश्चित करणे आणि प्रत्येक मंत्र्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन करणे, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. काही आमदारांनी विविध विभागांबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर शिंदे यांनी हा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. याशिवाय, पुढील काळात कोणत्या विकासकामांना प्राधान्य द्यायचे आणि सरकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत कसा पोहोचवायचा, याबाबतही मंत्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे समजते.