voicemaharashtralive.news

News Header

“तर मी फाशी घेईन…” जरांगेसमोर आशिमा मित्तल यांच्या वक्तव्याने अंतरवाली सराटीत एकच खळबळ; उपस्थित सर्वच अवाक

Wednesday, 02 September 2026, 10:48

मनोज जरांगे पाटील आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यातील संवादाने वातावरण गंभीर; ‘फाशी’च्या उल्लेखाने सर्वजण अवाक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीत उपोषण सुरू असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारकडून त्यांची समजूत काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, 12 सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. मराठा समाजातील बांधवांनी टप्प्याटप्प्याने मुंबईकडे रवाना व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच आझाद मैदानावर कोणीही जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती देत जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांच्या भूमिकेवर जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. “तुम्ही सरकारची बाजू घ्यायला इथे आला आहात का?” असा सवाल त्यांनी केला. त्यावर “ते माझे काम आहे,” असे मित्तल यांनी उत्तर दिले.

यानंतर सरकारवर टीका करताना जरांगे पाटील यांनी, “सरकारमुळे चांगल्या-चांगल्यांना फाशी घेण्याची वेळ आली,” असा उल्लेख केला. मात्र, या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रतिक्रिया दिली. “मनोजजी, नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे,” असे त्या म्हणाल्या.

मित्तल यांच्या या वक्तव्याने काही क्षणांसाठी आंतरवाली सराटीतील वातावरण गंभीर झाले. उपस्थितांमध्ये शांतता पसरली. मित्तल पुढे बोलत असतानाच जरांगे पाटील यांनी त्यांना थांबवत आपली भूमिका स्पष्ट केली.

“तुम्ही जिल्हाधिकारी आहात. तुम्ही फाशी घेण्याची भाषा बोलू नका. एखादा प्रश्न सोडवता आला नाही म्हणून तुमच्यावर टीका होईल. मी काय बोलतोय, हे तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही कशाला या भानगडीत पडत आहात?” अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी मित्तल यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

पुढे त्यांनी मित्तल यांच्या प्रशासकीय प्रवासाचे कौतुक करत सरकारवरही निशाणा साधला. “तुम्ही अभ्यास करून मोठ्या झालेल्या लेकी आहात. सरकारमध्ये चौथी नापास लोक मंत्री आहेत. ते लोक तुम्हाला शिकवून इकडे पाठवत आहेत. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून इथपर्यंत पोहोचला आहात. तुमची यूपीएससी आणि एमपीएससीची पुस्तकेही त्यांना वाचता येणार नाहीत,” असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

या संपूर्ण संवादामुळे आंतरवाली सराटीत काही काळ तणावाचे आणि गंभीर वातावरण निर्माण झाले.

More from this category

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”

पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय

अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा