voicemaharashtralive.news

News Header

Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण

Monday, 27 July 2026, 17:59

पुण्यातील राजगुरुनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, येथील एका पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधन मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, अनेक वाहनांमध्ये इंधन भरल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

देशभरात इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना समोर आली आहे. काही वाहनचालकांनी इथेनॉलमुळे इंजिनवर परिणाम होत असल्याचा दावा केला असला, तरी सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, आता पाणीमिश्रित इंधन मिळत असल्याच्या आरोपामुळे वाहनचालकांचा संभ्रम आणखी वाढला आहे.

राजगुरुनगरमधील संबंधित पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर अनेक वाहनं अचानक बंद पडल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे. या प्रकारामुळे वाहनचालकांसह पेट्रोल पंप व्यवस्थापनाच्याही अडचणी वाढल्या असून, नेमकं काय घडलं याचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असल्याने इंधन साठवणुकीबाबत काही तांत्रिक आव्हाने निर्माण होऊ शकतात, अशी चर्चा आहे. पेट्रोल पंपांवरील इंधन साठवण टाक्या पारंपरिक पेट्रोलसाठी तयार करण्यात आल्या असल्याने, E20 इंधनाच्या साठवणुकीसाठी आवश्यक बदल सर्वत्र झालेले नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर काही पेट्रोल पंप चालकांनी E20 इंधनाबाबत चिंता व्यक्त केल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी इंधन वितरण यंत्रातून (फ्युल डिस्पेन्सर) दूषित इंधन किंवा पाण्याचे अंश आढळल्याच्या तक्रारी समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इंधनाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, वाहनचालकांसह पंप चालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

मात्र, या प्रकरणावर बहुतांश पेट्रोल पंप चालकांकडून अधिकृतपणे प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या तक्रारींचे नेमके कारण काय आहे आणि त्यामागील वस्तुस्थिती काय आहे, याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास आणि अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल पंपांवरील इंधन जमिनीखालील टाक्यांमध्ये साठवले जाते. पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता किंवा इंधन वाहून आणणाऱ्या टँकरमधून पाण्याचे अंश मिसळल्यास इंधनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. E20 इंधनाच्या साठवणीत पाण्याचे प्रमाण ठरावीक मर्यादेपेक्षा वाढल्यास इथेनॉल त्या पाण्यासोबत मिसळू शकते. परिणामी, पाणी आणि इथेनॉलचे मिश्रण टाकीच्या तळाशी साचते, तर पेट्रोल वरच्या स्तरावर राहते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

काही पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार, इंधन वितरण यंत्राद्वारे टाकीच्या तळातून इंधन खेचले जात असल्याने काही वेळा इंधनासोबत पाणीमिश्रित द्रव वाहनात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शक्यतेमुळे वाहनचालकांसह पेट्रोल पंप चालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, पुण्यात पाणीमिश्रित इंधनामुळे अनेक वाहने बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही ग्राहकांनी बाटलीत भरलेले पेट्रोल तपासल्यानंतर त्यात पाण्याचे अंश असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकरणाची संबंधित यंत्रणांकडून चौकशी करण्यात येत आहे.

More from this category

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव

Navi Mumbai : तलवार-चॉपरने तरुणावर जीवघेणा हल्ला; मुलाला वाचवताना आईही जखमी, कोपरखैरणेत खळबळ

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा