voicemaharashtralive.news

News Header

Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर संजय राऊतांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

Tuesday, 28 July 2026, 11:14

संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात नेमकं काय सुरू असतं, हे सांगणं कठीण आहे. इटली दौऱ्यात त्यांनी प्लास्टिक नोटांचा अनुभव घेतला असावा. परदेशात एखादी नवी गोष्ट दिसली की ती भारतातही आणावी, असा त्यांचा विचार असतो. तुम्ही इटलीचा उल्लेख केला, कारण त्यांना त्या देशाबद्दल विशेष आकर्षण आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलही त्यांना आकर्षण आहे. परदेशात पाहिलेल्या, कालांतराने अप्रचलित ठरणाऱ्या काही गोष्टी भारतात लागू करण्याचा प्रयत्न केला जातो,” असा टोला त्यांनी लगावला.

मोदी सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला, याबाबत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. सरकारमधील एका महत्त्वाच्या मित्रपक्षाच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. “आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारला स्पष्ट संदेश दिला होता. आमच्या राज्यात या मुद्द्यावर मोठा दबाव आहे. आम्ही सरकारला पाठिंबा देत आहोत, पण त्याची राजकीय किंमत आम्ही मोजू शकत नाही. या भूमिकेमुळेच केंद्र सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला,” असा दावा राऊत यांनी केला.

याचवेळी त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरही टीका केली. “आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो मुलींशी गैरवर्तन झाल्याचे आरोप आहेत. या कारवाईचे आदेश कोणी दिले, याचे उत्तर देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत द्यावे. इतर अनेक विषयांवर सरकार भूमिका मांडते, मग जंतर-मंतरवरील लाठीचार्जबाबतही गृहमंत्र्यांनी निवेदन करावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल देशाची माफी मागावी,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “पेपरफुटी झाली हे राज्याचे मुख्यमंत्री मान्य करायला तयार नाहीत. या घोटाळ्याचे लाभार्थी त्यांच्या पक्षाशी संबंधित आहेत. नीटचा पेपर फुटवणारेही भाजपशी संबंधित लोक असल्याचा आमचा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटीची घटना स्पष्टपणे मान्य करावी. महाराष्ट्राची शैक्षणिक स्थिती खालावण्यास राज्य सरकार जबाबदार आहे,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओवरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांच्या व्हिडिओवर विनोदी प्रतिक्रिया देत त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणतात की तो व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिला, पण त्यावर आलेल्या टीकात्मक प्रतिक्रियांचाही विचार करायला हवा. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून ‘डिजिटल इंडिया’चे वेगळे चित्र देशासमोर मांडले. त्यांच्या मोहिमेमुळे भाजपच्या आयटी सेललाही बचावात्मक भूमिका घ्यावी लागली,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसारख्या पक्षासोबत जाणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. पवार साहेबांची विचारधारा मी जवळून पाहिली आहे आणि त्या विचारांमध्ये नरेंद्र मोदी यांना स्थान नाही,” असे ठाम विधान त्यांनी केले.

दरम्यान, संसदेत धर्मेंद्र प्रधान यांचे भाजपकडून करण्यात आलेल्या स्वागतावरही राऊत यांनी टीका केली. “प्रत्येक वादग्रस्त गोष्ट गौरवशाली दाखवण्याची सवय भाजपला लागली आहे. धर्मेंद्र प्रधान हे हुतात्मा नाहीत. नीट परीक्षा प्रकरणावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला,” असा दावा त्यांनी केला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “भ्रष्टाचाराविरोधात बोलणारा भाजपच आपल्या पक्षातील गंभीर आरोप असलेल्या नेत्यांचे समर्थन करताना दिसतो. त्यांना जणू काही गौरवाचे स्थान दिले जाते. धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वागतावरूनही भाजपची हीच भूमिका पुन्हा समोर आली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

More from this category

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय; सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, नेमकं काय घडलं?

Pune News : पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा संशय; गाड्या अचानक बंद पडल्याने ग्राहक हैराण

अभिजीत दिपकेच्या जीवाला धोका? बहिणीचे गंभीर आरोप; थेट राष्ट्रपतींकडे धाव

Navi Mumbai : तलवार-चॉपरने तरुणावर जीवघेणा हल्ला; मुलाला वाचवताना आईही जखमी, कोपरखैरणेत खळबळ

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा