voicemaharashtralive.news

News Header

जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारला थेट इशारा; ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार, नेमकं काय घडतंय?

Saturday, 29 August 2026, 10:26

जरांगेंच्या निर्णायक उपोषणाआधीच सरकारला थेट इशारा; ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार, 45 लाख वाहनांसह कूच करण्याची तयारी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा निर्णायक उपोषणाची हाक दिली आहे. अंतरवाली सराटी येथे आजपासून त्यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आंदोलनापूर्वीच मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतल्यास त्यासाठी मोठ्या संख्येने वाहनांची तयारी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. तब्बल 45 लाख वाहनांसह मुंबईकडे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी अंतरवाली सराटीकडे पूर्ण तयारीनिशी निघालो असल्याची माहिती गंगाधर काळकुटे यांनी दिली.

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने जाणूनबुजून चालढकल करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. चर्चेसाठी सरकारने कधीही यावे, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आपण आंदोलनाच्या ठिकाणाहून हलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

‘आमचा अंत पाहू नका’, असा थेट इशारा मराठा समाजाच्या आंदोलकांकडून सरकारला देण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या निर्णायक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.

पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

दरम्यान, वैजापूर तालुक्यातील खरज येथे काही पालकांनी कुणबी वैधतेच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते. चार विद्यार्थ्यांची कुणबी वैधता गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

खापर पणजोबा त्रिंबक निवृती यांच्या कुणबी नोंदीचा दाखला असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या वडिलांची नोंद मराठा असल्याने वैधता रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. चार सुनावण्या, कागदपत्रांची पूर्तता आणि गृह चौकशी पूर्ण झाल्यानंतरही निर्णय झालेला नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.

इंजिनिअरिंगच्या प्रवेशानंतरही वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती पालकांनी व्यक्त केली. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मराठवाड्यात 3 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

दरम्यान, मराठवाड्यात आतापर्यंत 3 लाख 13 हजार 897 कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आल्याची सरकारी आकडेवारी समोर आली आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी एकूण 3 लाख 14 हजार 498 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 524 अर्ज नाकारण्यात आले असून 77 अर्जांवर अद्याप निर्णय झालेला नाही.

मात्र, सरकारच्या या आकडेवारीवर मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. अनेक पात्र लाभार्थ्यांचे अर्ज अद्याप प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

More from this category

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”

पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय

अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा