Rain Alert : राज्यात पावसाचा कहर; रेड अलर्ट जारी, नद्यांना पूर, नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन
Maharashtra Weather Update : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाचा जोर कायम असून परिस्थिती गंभीर बनली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) विविध जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले आणि धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत असून धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने पूरप्रवण भागातील नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अमरावती जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून, पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अधिकृत परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यासाठीही भारतीय हवामान विभागाने पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले आणि धरणांतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सततच्या पावसामुळे अनेक धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून काही धरणांतून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून सध्या 2,498 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी आणि अनावश्यकपणे नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या भागांतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून अनेक लहान-मोठे नाले आणि ओढेही तुडुंब भरले आहेत.
दरम्यान, जळगावमधील हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आले असून सुमारे 78 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसामुळे मनुदेवी धबधबा प्रवाहित झाला असून मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आणि यावल परिसरातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. मुक्ताईनगरजवळील कुंड धरण भरले असून कुर्हा-काकोडा परिसरातील नदीही दुथडी भरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा परिणाम तीव्र जाणवत आहे. भीमा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेला असून महाराष्ट्र–कर्नाटक राज्यांमधील संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे. दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.