संजय राऊतांचा शिंदे-मोदी भेटीवर निशाणा; म्हणाले, “तू किती फोडलेस, मी किती फोडले यापलीकडे काही नाही”
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानांना संसदेत येण्यासाठी वेळ नसतो, मात्र फुटीर खासदारांसोबत भेटीगाठी आणि चर्चेसाठी वेळ असल्याचा आरोप राऊतांनी केला.
एकनाथ शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख असल्याचा ठाम युक्तिवाद उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
या भेटीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मोदी-शिंदे यांच्यातील चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तू किती फोडलेस, मी किती फोडले यापलीकडे त्यांच्यात काही चर्चा होईल, असं मला वाटत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
राऊत म्हणाले की, पक्षांतर करून आलेल्या खासदारांसोबत पंतप्रधानांनी भेटीगाठी घेणे योग्य नाही. घटना आणि कायद्याचा भंग करून पक्षांतर करणाऱ्यांना प्रतिष्ठा देऊ नये, अशी टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्रातील उद्योग आणि मालमत्तांवरूनही राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात अदानींना आणखी किती मालमत्ता द्यायच्या, अजून काय विकता येईल आणि विकण्यासाठी काही शिल्लक आहे का, यावरच मोदी आणि शिंदे यांच्यात चर्चा होईल, असा आरोप त्यांनी केला.
“शिंदे हे उद्धव ठाकरेंचे आमदार होते”
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवरही राऊतांनी टीका केली. “एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार हे कुठून निर्माण झालेले नाहीत. ते उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत. शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला असून हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे,” असा दावा त्यांनी केला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही राऊतांनी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाने दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप करत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर टीका केली.
“हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढा”
शिवसेना कोणाची याचा निर्णय जनतेच्या न्यायालयात आधीच झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. तसेच, मागील निवडणुकीत 40 आमदार होते, तर आता 60 आमदार निवडून आल्याचा दावा त्यांनी केला होता. यावरूनही राऊतांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिले.
“नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, मात्र त्यांनी शिवसेना पक्षावर दावा केला नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल आणि ते स्वतःला खरे नेते मानत असतील, तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा. त्यानंतर जनतेच्या दरबारात कोण मोठं आहे, हे स्पष्ट होईल,” असे राऊत म्हणाले.
शिंदे गटाने स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे आव्हानही राऊतांनी दिले. “बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह अमित शहा यांच्या मदतीने तसेच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मिळवून त्यावर निवडणूक लढवणे योग्य नाही. ही मते शिवसेनेची आहेत आणि त्यावर शिंदे गटाचा अधिकार नाही,” असा दावा त्यांनी केला.
शेवटी शिंदे यांच्यावर उपरोधिक टीका करताना राऊत म्हणाले की, “शिंदेंसाठी उत्तम निशाणी म्हणजे चमचा आहे.”