“पॉझिटिव्ह कंटेंट टाका, तरच पैसे मिळतील”; राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलांना आणल्याचा मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा
राहुल गांधींच्या पुणे कार्यक्रमासाठी मुलींना पैसे देऊन आणलं? मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाबाबत गंभीर आरोप केले आहेत. कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयांमधून मुलींना पैसे देऊन आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना कार्यक्रम आणि राहुल गांधींबाबत केवळ सकारात्मक मजकूर पोस्ट करण्यास सांगण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांच्या दाव्यानुसार, कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सुमारे 90 ते 95 मुली काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयांशी संबंधित आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून मुला-मुलींना कार्यक्रमासाठी आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना कार्यक्रमाबाबत सकारात्मक कंटेंट पोस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नकारात्मक मजकूर पोस्ट केल्यास पैसे दिले जाणार नाहीत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांचाही उल्लेख केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम चर्चेत आणण्यासाठी वाद निर्माण केल्याचा आरोप
मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराची तुलना चित्रपटाच्या प्रमोशनशी केली. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो चर्चेत यावा यासाठी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जातो, त्याचप्रमाणे राहुल गांधींचा कार्यक्रम चर्चेत राहावा यासाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुण्यात राडा
दरम्यान, राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमापूर्वी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री सुमारे 10 वाजता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन धुमश्चक्री झाल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी काही जणांविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र, केवळ आपल्या कार्यकर्त्यांवरच कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. ही कारवाई दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दावाही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.