Sharad Pawar : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर शरद पवार काय म्हणाले?
Sharad Pawar : शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवर शरद पवार म्हणाले, “कोर्टाचा निकाल येईल; त्याआधी भाष्य करणं योग्य नाही”
पुणे : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून ते शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीपर्यंत तसेच साखरेच्या दरांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत. सरकारने स्वीकारलेले धोरण चुकीचे असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. सरकारने योग्य पद्धतीने निर्णय घेतले नाहीत, तर न्यायालयाला निर्णय घ्यावे लागतील, असा कडक शब्दांत सल्ला न्यायालयाने दिल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत पवारांना विचारण्यात आले. यावर त्यांनी निकाल येईपर्यंत भाष्य करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “कोर्टाचा निकाल येईल. सुनावणी सुरू आहे, अजून संपलेली नाही. त्याआधी आम्ही भाष्य करणं दोघांच्याही हिताचं नाही. काय असेल ते कळेल.”
पंतप्रधान मोदी बारामतीत येणार?
ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी सांगितले की, पंतप्रधान बारामतीत येणार असल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. 16 ऑक्टोबरला त्यांच्या बारामती दौऱ्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींना बारामतीत एक प्रेझेंटेशन देण्यात येणार असल्याची माहितीही पवारांनी दिली. सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नावेळी काही लोकांनी त्यांना प्रेझेंटेशन दिले होते. त्याबाबतची माहिती पंतप्रधानांना सविस्तर जाणून घ्यायची असल्याचे पवारांनी सांगितले.
साखरेच्या वाढलेल्या दरांवर पवारांची चिंता
साखरेचे दर वाढले असले तरी त्याचा पुरेसा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केली. उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनाच्या वाढलेल्या दरातील काही हिस्सा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
तसेच, साखर आयात करणे योग्य नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले. आयात केलेल्या साखरेचा नेमका फायदा कधी मिळेल, हे सांगता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून पिण्याचे पाणी आणि इतर प्रश्नही निर्माण झाले असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
FDA कारवाईबाबत काय म्हणाले?
FDAच्या कारवाईबाबत विचारले असता पवारांनी दुधातील भेसळ थांबली असल्याचे सांगितले. मात्र यामुळे दुधाचे उत्पादन कमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
मराठा आरक्षणावर पवारांचे भाष्य
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी, “बघुया आता काय होतंय. सकाळी काही मंत्री तिथे जाणार आहेत,” असे सांगत या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.