अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!
पुण्यातील एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आर्थिक अडचणी, कर्ज आणि एमपीएससीच्या परीक्षांमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या नैराश्याचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी राज्य सरकार आणि एमपीएससीच्या कारभारावर जोरदार टीका करत महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे.
धाराशिवमध्ये प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अभिजीत दीपके यांनी त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रथमेशच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. प्रथमेश आर्थिक अडचणींमध्ये होता. त्याच्यावर कर्जही होतं. पुण्यात राहताना खर्च भागवण्यासाठी तो अनेक अडचणींचा सामना करत होता. त्यातच शेतीचं नुकसान आणि दुष्काळामुळे त्याच्यावर मानसिक ताण वाढला होता, असं दीपके यांनी सांगितलं.
कितीही संकटं आली तरी विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये आणि हार मानू नये, असं आवाहनही अभिजीत दीपके यांनी केलं. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपण स्वतः महाराष्ट्रभर मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
एमपीएससीच्या कारभारावर हल्लाबोल
ग्रामीण भागातून मोठ्या अपेक्षेने शहरात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी असतात. प्रथमेश गेल्या चार वर्षांपासून पुण्यात एमपीएससीची तयारी करत होता. रोजगार नसल्यामुळे त्याचा खर्च कुटुंबीयांच्या मदतीवर भागत होता. खर्च कमी करण्यासाठी तो अनेकदा स्वतःच्या गरजांवर मर्यादा घालत होता, असा दावा दीपके यांनी केला.
एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, परीक्षा झाल्यानंतर निकालाला विलंब होतो आणि पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता आणि नैराश्य निर्माण होत असल्याची टीका त्यांनी केली. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती अशीच असल्याचंही त्यांनी म्हटलं.
विद्यार्थ्यांमध्ये वाढता संताप
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी गट-क परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या तयारीवर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील गोंधळावर सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शकपणे आणि वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात, तसेच रखडलेले निकाल आणि परीक्षा प्रक्रियेतील समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे.