Abhijeet Dipke : कंगना राणौतवर अभिजीत दीपके यांचा जोरदार हल्लाबोल; 15 ते 28 वयोगटातील तरुणांबाबत मोठं वक्तव्य
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी नुकत्याच Gen Z (15 ते 28 वयोगटातील तरुणां) संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विधानावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्याला विरोध दर्शवला आहे.
या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा कंगना राणौत यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. तरुणांबाबत केलेल्या त्यांच्या विधानावर आक्षेप घेत दिपके यांनी कंगनावर टीका करत आपली स्पष्ट भूमिका मांडली.
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. पेपरफुटीच्या मुद्द्यावर त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा विषय राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
या आंदोलनादरम्यान हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तर देशातील अनेक शहरांमध्येही समर्थनार्थ आंदोलने झाली. आंदोलनाची तीव्रता वाढत गेल्यानंतर सरकारवर दबाव वाढल्याचे बोलले जात असून, त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडींची देशभरात मोठी चर्चा झाली.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी संसदेत हजेरी लावली. यावेळी सत्ताधारी पक्षातील खासदारांनी त्यांचे स्वागत केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली. या पार्श्वभूमीवर आंदोलन, सरकारची भूमिका आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर करत जंतर-मंतरवरील आंदोलन आणि Gen Z तरुणांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. आंदोलनाच्या स्वरूपावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी आंदोलनकर्त्यांवर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे.
कंगना राणौत यांनी आंदोलनकर्त्यांवर टीका करत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच आंदोलनाच्या ठिकाणी अयोग्य प्रकार सुरू असल्याचाही दावा त्यांनी आपल्या व्हिडिओत केला. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा कंगना राणौत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्याला उत्तर देत दिपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, या वादामुळे राजकीय आणि सामाजिक चर्चांना आणखी वेग आला आहे.
अभिजीत दिपके यांनी कंगना राणौत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना Gen Z तरुणांच्या बाजूने ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, “15 ते 28 वयोगटातील तरुणांना सतत ट्रोल करण्यामागचं कारण काय? हेच तर देशाचं भविष्य आहेत. हेच उद्याचे जबाबदार नागरिक आणि मतदार आहेत. सामान्य कुटुंबातून आलेल्या या मुलांवर अशा प्रकारे टीका करून नेमकं काय साध्य होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कंगना राणौत यांनी आंदोलनावर टीका केल्यानंतर अभिजीत दिपके यांनी यापूर्वीही त्याला प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी त्यांनी “कंगना राणौत यांच्या प्रत्येक वक्तव्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधत आपल्या भूमिकेची पुनरावृत्ती केली आहे.
दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत कंगना राणौत यांनी सुरुवातीपासूनच टीकात्मक भूमिका घेतली असून, या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडिओही शेअर केले आहेत. त्यांच्या वक्तव्यांवरून आणि त्याला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांमुळे हा वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे.