कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव का नाही? प्रश्न विचारताच गणेश नाईकांनी दिलं स्पष्ट स्पष्टीकरण
एकनाथ शिंदेंचं नाव पत्रिकेतून वगळल्याने वाद; नरेश म्हस्के यांचा इशारा, ‘शिवसेनेचे नगरसेवक शिवसेना स्टाईलनेच उत्तर देतील
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेमुळे उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि वनमंत्री Ganesh Naik यांच्यातील राजकीय वाद पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई महापालिकेतर्फे उद्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून गणेश नाईक यांचे नाव पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या पत्रिकेत खासदार Naresh Mhaske आणि खासदार Shrikant Shinde यांची नावे आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यामुळे नवी मुंबईतील या कार्यक्रमात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली असून, या घडामोडींमुळे शिंदे-नाईक यांच्यातील मतभेदांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याने शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत राहिल्यास शिवसेनेचे नगरसेवक ‘शिवसेना स्टाईलने’ प्रत्युत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला.
नवी मुंबईतील प्रशासनाचा सध्याचा कारभार योग्य पद्धतीने सुरू नसल्याची टीका करताना म्हस्के म्हणाले की, ठाणे महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता असून यापूर्वीही शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आम्ही सहयोगी पक्षांच्या नेत्यांचा सन्मान राखत त्यांच्या नावांचा समावेश कार्यक्रम पत्रिकांमध्ये करत आलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदेंना डावलण्याचा हा पहिलाच प्रकार नाही
नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला; मात्र या सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने शिवसेनेत नाराजीची भावना निर्माण झाली होती. या प्रकरणाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीपर्यंत उमटल्याची चर्चा होती.
गणेश नाईक यांची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेच्या नव्या कार्यक्रम पत्रिकेतही एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वनमंत्री गणेश नाईक नवी मुंबईतील एका शाळेत उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम पत्रिकेतील नाव वगळल्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता, त्यांनी याविषयी अनभिज्ञता दर्शवली. “मला याची कोणतीही माहिती नाही. याबाबत महापालिका आयुक्तांनाच विचारावे,” असे उत्तर गणेश नाईक यांनी दिले.