voicemaharashtralive.news

News Header

महायुतीत पुन्हा धुसफूस? शिंदेंच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळेच भाजप सत्तेत; एका पोस्टने वाढवल्या चर्चांना उधाण

Thursday, 06 August 2026, 10:41

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळेच आज भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्तेत आहे, असा दावा करत शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने शिवसेनेचे आभार मानावेत आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरोधातील वक्तव्ये थांबवावीत, असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले. धंगेकर यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले असून त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना धंगेकर यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. “सर्वसामान्य महिलांच्या हितासाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्याचा धाडसी निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या योजनेचा मोठा लाभ महायुतीला झाला आणि अनेक आमदार निवडून आले. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येण्यात या योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याचे श्रेय एकनाथ शिंदे यांनाच द्यायला हवे,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपच्या काही नेत्यांवरही टीका केली. “काही नेते विरोधकांपेक्षा मित्रपक्षालाच लक्ष्य करत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात करण्यात आलेली वक्तव्ये अयोग्य असून टीका करताना संयम आणि जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे,” असे धंगेकर यांनी सांगितले.

काय म्हटले आहे धंगेकरांच्या पोस्टमध्ये?

धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज भाजप सत्तेत असेल तर त्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठा वाटा आहे. राज्यातील लोकप्रिय आमदारांची यादी केली तर उदय सामंत आणि शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी अग्रस्थानी दिसतील. त्यामुळे भाजपने शिवसेनेचे आभार मानावेत आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरोधातील वक्तव्ये थांबवावीत.”

याशिवाय, भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांचा त्यांनी निषेध केला. “अशी वक्तव्ये आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय शिंदेंनाच

धंगेकर यांनी पुढे म्हटले की, ‘लाडकी बहीण’ योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली. या योजनेमुळे महायुतीला, विशेषतः भाजपसह सर्व घटक पक्षांना निवडणुकीत मोठा फायदा झाला. त्यामुळे या यशाचे श्रेय एकनाथ शिंदे यांनाच जाते. वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या काही नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यावी.

उदय सामंत यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, “राज्याच्या विकासासाठी आणि उद्योगवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेते अशी उदय सामंत यांची ओळख आहे. अशा नेत्यांवर टीका करून काही जण केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

धंगेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही आवाहन केले. संबंधित नेत्यांवर पक्षशिस्तीची कारवाई करावी, अन्यथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित विविध मुद्दे आणि पुरावे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडू, असा इशाराही त्यांनी दिला.

More from this category

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”

पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय

अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा