voicemaharashtralive.news

News Header

पालखी सोहळ्यातील बैलजोडीच्या मानासाठीचे आंदोलन स्थगित; ४८ तासांत तोडगा काढण्याचे प्रशासनाचे आश्वासन

Friday, 12 June 2026, 15:15

आळंदीत बैलजोडीच्या मानाच्या वादावर सकारात्मक घडामोड; उमेश रानवडे यांचे उपोषण मागे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथासाठी बैलजोडी निवडीच्या मानावरून सुरू झालेला वाद अखेर निवळण्याच्या मार्गावर आहे. या मागणीसाठी गुरुवारी उपोषणास बसलेल्या उमेश रानवडे यांनी, संबंधित समिती आणि देवस्थान विश्वस्तांकडून ४८ तासांत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याच्या मानावरून वाद अधिक तीव्र झाला आहे. बैलजोडी निवड समितीने हर्षवर्धन रानवडे आणि तुळशीराम रानवडे या दोन कुटुंबांना मान देण्याबाबत पत्र दिले असले, तरी आळंदी देवस्थानकडून अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

याच पार्श्वभूमीवर हा मान आपल्या कुटुंबाला मिळावा, या मागणीसाठी उमेश रानवडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. गुरुवारी (११ जून) सकाळी त्यांनी आपल्या बैलजोडीसह महाद्वार चौकातून मिरवणूक काढत आंदोलनस्थळी प्रवेश केला आणि बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.

“जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका उमेश रानवडे यांनी घेतली. त्यांनी निवेदनाद्वारे आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. आजपर्यंत पालखी रथासाठी बैलजोडी सेवा करण्याची संधी मिळालेली नसल्याचे सांगत, यंदा हा मान देण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

तसेच, बैलजोडी निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी बैलजोडी निवड समिती आणि समितीचे उपाध्यक्ष शिवाजी रानवडे यांच्या कुटुंबीयांनाच वारंवार हा मान दिला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या निवडीबाबत निष्पक्ष निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याने संबंधित बैलजोडी निवड समिती अधिकृत आहे की अनधिकृत? याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. समिती अधिकृत असल्यास देवस्थान समितीने संबंधितांवर कठोर कारवाई करावी. समिती अनधिकृत असल्याचे आढळल्यास ती बरखास्त करून नव्याने समितीची स्थापना करण्याची मागणीही उमेश रानवडे यांनी केली.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, बैलजोडी निवड समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, उपाध्यक्ष शिवाजी रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, रामचंद्र भोसले, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, नितीन साळुंखे आणि मच्छिंद्र शेंडे यांच्या उपस्थितीत उमेश रानवडे यांना लिंबूपाणी देऊन बैलजोडीबाबतचे उपोषण स्थगित करण्यात आले. पुढील ४८ तासांमध्ये या बैलजोडी निवडीबाबत तोडगा काढू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेतल्याचे रानवडे यांनी जाहीर केले.

More from this category

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मोठा हल्लाबोल; म्हणाले, “आम्ही हॉटेलमध्ये दारे लावून…”

पाकिस्तानच्या जवळीकचा बांगलादेशला बसला फटका? भारताविरोधात घेतला मोठा निर्णय

अभिजीत दीपके यांची महाराष्ट्र सरकारला धडकी भरवणारी घोषणा; धाराशिवमध्ये पोहोचताच MPSC विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

एकनाथ शिंदेंच्या OSD आणि फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड; लंडन प्रवासात मोठा बदल

🔮 भविष्य 💼 करिअर 📢 जाहिरात करा