Rain Update: महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा
Rain Update : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित प्रमाणात पावसाची हजेरी अद्याप लागलेली नाही. अनेक भागांत समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष हवामानाच्या पुढील अंदाजाकडे लागले आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला असून, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात मुसळधार पाऊस नेमका कधी बरसणार, याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
२ जून रोजी मॉन्सूनने केरळमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रात जवळपास १५ दिवस त्याची गती मंदावल्याने पुढील प्रवासाला विलंब झाला. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले. आता राज्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, काल रात्री अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, १ जुलैपासून राज्यातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवसांचा सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
मध्यरात्रीनंतर अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. मॉन्सून राज्यभर पोहोचला असला तरी अनेक ठिकाणी अद्याप अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांची तयारी पूर्ण केली असली, तरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत त्यांना थांबावे लागत आहे.
दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी राज्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिक आणि शेतकरी दोघांचेही लक्ष आगामी काही दिवसांतील हवामानाच्या घडामोडींवर लागले आहे.
1 जुलैपासून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवसांचा यलो अलर्ट जारी केला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात उशिरा का होईना, पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.